Farmer Success Story : देशातील शेतकऱ्यांनी गेल्या काही दशकांमध्ये शेती व्यवसायात मोठे बदल केले आहेत. आता शेतीमध्ये शेतकरी बांधव वेगवेगळे प्रयोग राबवत आहे. या अभिनव प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे. फक्त पारंपारिक पिकांच्या शेतीवर अवलंबून न राहता बाजाराच्या मागणीनुसार नगदी पिकांची लागवड केली तर शेती हा व्यवसाय देखील फायदेशीर ठरू शकतो.
नासिक जिल्ह्यातील एका युवा शेतकऱ्याने देखील बाजाराचा अंदाज घेत जिद्द व चिकाटीच्या जोरावर नियोजनबद्ध शेती करून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याचे मौजे ब्राह्मणगाव येथील युवा शेतकरी प्रदीप मधुकर अहिरे यांनी वांगी आणि पपईच्या शेतीतून लाखो रुपयांचे उत्पादन घेतले आहे.
त्यामुळे सध्या प्रयोगशील शेतकरी प्रदीप अहिरे यांची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे. वास्तविक, कसमादे पट्टा अर्थातच कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा हा भाग कांद्याच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. याशिवाय या परिसरातील शेतकरी डाळिंब या फळ पिकाची देखील मोठ्या प्रमाणात शेती करतात. तर काही शेतकरी बांधव टोमॅटोसारख्या भाजीपाला पिकांची लागवड करतात.
परंतु गेल्या काही वर्षांपासून कांदा आणि टोमॅटोचे पीक शेतकऱ्यांना डोईजड ठरू लागले आहे. यामुळे परिसरातील विविध शेतकरी आता कांदा आणि टोमॅटोच्या पिकाला पर्यायी पिकाची शोधाशोध करत आहेत. ब्राह्मणगाव येथील प्रदीप यांनी देखील कांदा आणि टोमॅटो पिकाला पर्यायी पिक म्हणून पपई आणि वांग्याची शेती सुरू केली आहे.
पारंपारिक पिकाला फाटा देत अहिरे यांनी वांग्याची आणि पपईची शेती यशस्वी करून दाखवली आहे. प्रदीप सांगतात की त्यांनी जानेवारी महिन्यात एक एकर क्षेत्रात वेलकम 46 या जातीच्या पपईची लागवड केली. तसेच जून महिन्याच्या सुरुवातीला दोन एकरात त्यांनी देशी रवय्या या जातीच्या वांग्याची लागवड केली.
लागवड केल्यानंतर या दोन्ही पिकांची योग्य पद्धतीने काळजी घेतली. योग्य प्रमाणात खते आणि औषधे देण्यात आलीत. पाणी व्यवस्थापन देखील योग्य पद्धतीने केले. यामुळे त्यांना या दोन्ही पिकातून चांगले उत्पादन मिळू लागले आहे. सध्या पपई आणि वांगी दोन्ही पिकांपासून त्यांना उत्पादन मिळत आहे.
प्रदीप यांनी सांगितल्याप्रमाणे सध्या रोज 70 ते 80 कॅरेट वांग्याचे उत्पादन आणि पपईचे 40 ते 50 कॅरेट उत्पादन होत आहे.विशेष म्हणजे वांग्याच्या शेतीतून खर्च वजा करून पाच लाख रुपये तर पपईच्या शेतीतून दोन लाख रुपये मिळणार अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
एकूणच काय तर त्यांना अवघ्या काही महिन्यांच्या काळात तीन एकर जमिनीतून सात लाखांपर्यंतचे उत्पादन मिळणार आहे. निश्चितच प्रदीप यांचा हा प्रयोग इतरांसाठी देखील मार्गदर्शक राहणार आहे. खरतर दोन वर्षांपूर्वी प्रदीप यांच्या वडिलांचे निधन झाले. मात्र वडिलांच्या निधनानंतर स्वतःला सावरत त्यांनी शेतीमध्ये केलेली ही कामगिरी निश्चितच वाखाण्याजोगी आहे.