Farmer Success Story : अलीकडे शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न मिळत असल्याची ओळख तुम्ही सर्वत्र ऐकली असेल. खरेतर ही वास्तविकता आहे. शेतीमधून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले तर बाजारात मालाला भाव मिळत नाही आणि यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत आहे. यामुळे अनेकांनी शेतीच्या व्यवसायाला रामराम ठोकला आहे.
मात्र अनेक जण आजही नैसर्गिक आणि सुलतानी संकटांचा सामना करत शेती करत आहेत. विशेष म्हणजे नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून या व्यवसायातून लाखोंची कमाई करत आहे.
असेच एक कौतुकास्पद उदाहरण समोर आले आहे ते पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून. शिरूर तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने कलिंगडच्या पिकात मिरचीचे आंतरपीक घेतले असून या शेतकऱ्याला आता लाखो रुपयांची कमाई होणार आहे.
यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा पाहायला मिळत असून या शेतकऱ्याचा हा प्रयोग पाहण्यासाठी त्यांच्या बांधावर इतर शेतकरी गर्दी करत आहेत. बापू दादा आनंदराव पऱ्हाड असे या प्रयोगशील शेतकऱ्यांचे नाव आहे.
बापू दादा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जवळपास दोन महिन्यांपूर्वी कलिंगडची लागवड केली होती. दिड एकरात कलिंगडची लागवड केली आणि यानंतर त्यांनी याच पिकात मिरचीची आंतरपीक म्हणून लागवड केली.
कलिंगड लागवडीसाठी त्यांनी बेड तयार केलेत आणि बेडवर मल्चिंग पेपर टाकून याची लागवड केली. कलिंगड पिकाला पाणी देण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला. यामुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन करता आले शिवाय कमी पाण्यात त्यांना पीक घेता येणे शक्य झाले.
विशेष म्हणजे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी विद्राव्य खतांची देखील पूर्तता केली. यामुळे 60 दिवसांच्या कालावधीत अर्थातच दोन महिन्यात त्यांना कलिंगडच्या पिकातून चांगले विक्रमी उत्पादन मिळाले आहे.
सध्या उष्णता प्रचंड वाढली असून यामुळे बाजारात कलिंगडला मोठी मागणी आली आहे. यामुळे प्रति दहा किलो 1100 ते 1200 या दरात कलिंगडची विक्री केली जात आहे. त्यांना दीड एकर जमिनीतून 35 ते 40 टन एवढे कलिंगडचे उत्पादन मिळणार असून यातून त्यांना जवळपास चार लाख रुपयांची कमाई होणार आहे.
विशेष बाब अशी की कलिंगड पिकात लागवड केलेल्या मिरचीतून त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. यामुळे कमाईचा हा आकडा आगामी काळात आणखी वाढणार आहे.
निश्चितच बापूदादा यांनी शेतीमध्ये केलेला हा प्रयोग त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून यामुळे त्यांना मोठा आर्थिक लाभ झाला आहे. या कामी बापूदादा यांना त्यांच्या पत्नीने देखील मोलाची साथ दिली आहे.