Farmer Success Story : शेतीचा व्यवसाय हा खूपच आव्हानात्मक बनला आहे. खरंतर पूर्वी शेती व्यवसायात आता सारखे यांत्रिकीकरण नव्हते. यामुळे शेती व्यवसायात अधिकचे कष्ट घ्यावे लागत. ट्रॅक्टर सारख्या आधुनिक यंत्रांच्या कमतरतेमुळे शेतीचा व्यवसाय हा खूपच क्लिष्ट बनला होता.
आता मात्र वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि यंत्रांच्या वापरामुळे शेती व्यवसाय हा खूपच सोपा झाला आहे. परंतु दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस त्यामुळे शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये.
जर शेतकऱ्यांनी या नैसर्गिक संकटांचा सामना करून शेतीमधून चांगले उत्पादन मिळवले तर उत्पादित झालेल्या मालाला चांगला भाव मिळत नाही.
मात्र असे असले तरी काही प्रयोगशील शेतकरी याही संकटातून मार्ग काढत शेतीमधून चांगली कमाई करत आहेत.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक येथील राजेंद्र हाके या प्रयोगशील शेतकऱ्याने अवघ्या एक एकर जमिनीतून एक लाख रुपये खर्च करून सहा लाख रुपयांपर्यंतची कमाई मिळवण्याची किमया साधली आहे.
यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा पाहायला मिळत आहे. हाके यांची त्यांच्या गावात दहा एकर जमीन आहे. या जमिनीत ते पारंपारिक पिकांसोबतच मोसंबीची शेती करत असत.
मात्र मोसंबी शेतीमध्ये त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. परंतु न खचता त्यांनी दीड एकर जमिनीत पेरूची बाग लावली.
त्यांनी तैवान पिंक जातीच्या पेरूची 800 रोपे लावलीत. या पेरू बागेसाठी त्यांनी एक लाख रुपये खर्च केला आहे. यातून त्यांना 400 कॅरेट पेरूचे उत्पादन मिळाले आहे.
आतापर्यंत त्यांना यातून तीन ते चार लाख रुपयांची कमाई खाली असून आणखी दोन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना यातून मिळणार आहे.
जर पारंपारिक पिकांना बगल दिली आणि फळबागांची लागवड केली तर शेतीमधून चांगली कमाई होऊ शकते हेच हाके यांनी आपल्या प्रयोगातून दाखवून दिले आहे.