Farmer Success Story : शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय, शेती करून फक्त पोट भरू शकता पण चांगली कमाई होऊ शकत नाही अशी धारणा बनत चालली आहे. पण जर जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर काळ्या आईची सेवा केली तर ही धरणीमाता सोने आणि मोतीसमान शेतमाल देते. शेतीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करून अनेक शेतकऱ्यांनी ही गोष्ट खरी ठरवली आहे.
नवनवीन प्रयोगातून अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची कमाई केली आहे. असाच एक प्रयोग सातपुडा पर्वतरांगांमध्ये पाहायला मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील कोणवालपाडा येथील शेतकरी बिज्या पाडवी यांनी अर्धा एकर जमिनीत ड्रॅगन फ्रुट लागवड यशस्वी करून दाखवली आहे.
अर्धा एकर म्हणजेच 20 गुंठे जमिनीत या प्रयोगशील शेतकऱ्याने गेल्या वर्षी मे महिन्यात ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली. नाशिक जिल्ह्यातील बोरगाव येथे त्यांनी पहिल्यांदाच ड्रॅगन फ्रुट लागवड पाहिली.
यानंतर त्यांनी आपल्या जमिनीतही ड्रॅगन फ्रुट ची लागवड करायची असा निर्णय घेतला. यानुसार गेल्यावर्षी मे महिन्यात एका खांबावर चार रोप याप्रमाणे 120 खांबांवर 480 रोपांची लागवड करण्यात आली. यासाठी त्यांना 80 हजार रुपयांचा खर्च करावा लागला.
विशेष म्हणजे या ड्रॅगन फ्रुटच्या पिकातून या शेतकऱ्याला उत्पादन देखील मिळू लागले आहे. पाडवी त्यांनी उत्पादित केलेले ड्रॅगन फ्रुट स्वतः विकत आहेत. रस्त्याच्या कडेला स्टॉल लावून दोनशे रुपये प्रति किलो याप्रमाणे ते आपल्या मालाची विक्री करत आहेत.
यामुळे त्यांना या अर्धा एकर जमिनीत लागवड केलेल्या ड्रॅगन फ्रुट पिकातून चांगली कमाई होणार आहे. एकंदरीत शेतीमध्ये जर काळाच्या ओघात बदल केला तर नक्कीच यातून चांगली कमाई होऊ शकते हेच पाडवी यांच्या या उदाहरणावरून स्पष्ट होते.
शेती हा फक्त पोट भरण्याचा व्यवसाय नसून यामध्ये जर योग्य लक्ष घातले तर यातून लाखो रुपये कमवता येणे सहज शक्य आहे. शेतीमध्ये जिद्द, चिकाटी आणि सातत्य असेल आणि याच्या जोडीला मेहनतीची साथ मिळाली तर नक्कीच शेती हा व्यवसाय लखपती बनवणार आहे.