Farmer Success Story : मराठवाडा म्हटलं की सर्वप्रथम आपल्या मनात विचार येतो तो भीषण दुष्काळाचा. कारण की मागील तीन वर्षे वगळता मराठवाड्यात नेहमीच दुष्काळाचे सावट पाहायला मिळाले आहे. मात्र गेली तीन वर्षे मराठवाड्यात चांगला पाऊस पडला असल्याने येथील शेतकऱ्यांना शेतीचा व्यवसाय फायदेशीर ठरू लागला आहे. यंदा मात्र मराठवाड्यावर पुन्हा दुष्काळाचे सावट पाहायला मिळत आहे.
कारण की मराठवाड्यातील काही भागात अजूनही म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. मात्र असे असले तरी दुष्काळी भाग म्हणून कुख्यात असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला दिशा दाखवण्याचे काम केले आहे. अशातच मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने मात्र एक एकर शेत जमिनीतून अवघ्या सहा महिन्यांच्या काळात सव्वा पाच लाख रुपयांची कमाई करून दाखवली आहे.
या प्रयोगशील शेतकऱ्याने शिमला मिरचीच्या लागवडीतून लाखों रुपयांच उत्पन्न मिळवले आहे. यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची संपूर्ण पैठण तालुक्यात चर्चा पाहायला मिळत आहे. तालुक्याच्या गावापासून अवघ्या 23 किलोमीटर अंतरावर वसलेल्या हर्षी गावातील कृष्णा आगळे नामक प्रयोगशील शेतकऱ्याने एक एकर शेत जमिनीत शिमला मिरचीची लागवड करून मात्र सात महिन्यांच्या काळात सव्वा पाच लाख रुपयांचे उत्पन्न कमवून दाखवले आहे.
आगळे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे वडिलोपार्जित नऊ एकर जमीन आहे. यात त्यांनी मोसंबी, ऊस आणि रेशीम शेतीची सुरू केली आहे. तसेच काही जमिनीवर सोयाबीन, कापूस आणि तूर पिक देखील लावले आहे. विशेष म्हणजे या पिकात त्यांनी आंतरपीक म्हणून मिरचीची ही लागवड केलेली होती. दरम्यान गेल्या वर्षी त्यांनी राज्य शासनाच्या पोखरा योजनेअंतर्गत शेडनेट साठी अनुदान मिळवत एक एकर जमिनीवर शेडनेट उभारले आहे. यासाठी शासनाकडील अनुदान आणि त्यांनी स्वहिस्याचे चार लाख रुपये गुंतवले आहेत.
याच शेडनेटमध्ये त्यांनी जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवाड्यात शिमला मिरचीची लागवड केली. अवघ्या दोन महिन्याच्या काळात सुयोग्य नियोजन केल्यामुळे या शिमला मिरचीचे पिक त्यांच्या हातात आले. विशेष म्हणजे शिमला मिरची उत्पादित करण्यासाठी त्यांनी बाहेरील मजूर लावले नाही तर घरच्यांनीच सर्वे आवरून घेतले. यामुळे त्यांचा मजुरीवरील हजारो रुपयांचा खर्च वाचला आहे. यावर्षी पावसामुळे कमी उत्पादन मिळाले मात्र तरीही सव्वा पाच लाख रुपये कमाई झाली असल्याचे आगळे यांनी यावेळी सांगितले आहे.
शेडनेट मध्ये शिमला मिरची व्यतिरिक्त त्यांनी रोपवाटिका देखील सुरू केली आहे. या रोपवाटिकेतून त्यांना आत्तापर्यंत सव्वा सहा लाख रुपयांची कमाई झाली आहे. एकूणच 9 एकर जमिनीत जेवढं उत्पन्न त्यांना मिळत नाही तेवढं एक एकरात उभारलेल्या शेडनेट मधून त्यांना मिळाल आहे. शेडनेट शेतीचा फायदा होत असल्याचे आगळे यांनी नमूद केले असून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेडनेट शेती मधून चांगले उत्पन्न मिळवले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.