Farmer Success Story : काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल केला आणि योग्य नियोजन केले तर शेतीचा व्यवसाय हा फायदेशीर ठरू शकतो. अनेक नवयुवक तरुण शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आता नवनवीन प्रयोग सुरु केले आहेत. या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून प्रयोगशील शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे.
सांगली जिल्ह्यातील एका प्रगतशील शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये असाच एक नवीन प्रयोग केला असून सदर शेतकऱ्याला चांगले उत्पन्न देखील मिळाले आहे.
जिल्ह्यातील आष्टा येथील प्रयोगशील शेतकरी प्रशांत नारायण शिंदे यांनी पेरू बागेतून एकरी सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दाखवले आहे. यामुळे सध्या प्रशांत यांची पंचक्रोशीत चर्चा पाहायला मिळत आहे. प्रशांत यांची आष्टा ते इस्लामपूर या रस्त्यावर दहा एकर शेती आहे.
यात त्यांनी एकच पीक घेण्याऐवजी वेगवेगळ्या पिकांची लागवड केली आहे. या जमिनीवर त्यांनी साडेचार एकर क्षेत्रात केळी, दोन एकर क्षेत्रात ऊस आणि एक एकर क्षेत्रात पेरूची लागवड केली आहे. 2018 मध्ये जमिनीची मशागत करून त्यांनी पेरूची लागवड केली.
पेरू लागवड करण्यापूर्वी त्यांनी जमिनीत शेणखत टाकले. त्यांनी व्हीएनआर जातीच्या पेरूची लागवड केली आहे. पेरूची रोपे त्यांनी छत्तीसगडमधील रायपुर येथून मागवली होती. त्यांनी 180 रुपये याप्रमाणे 450 रोपे मागवून याची लागवड केली.
बारा बाय आठ फुट अंतरावर त्यांनी या रोपांची लागवड केली. पेरूची झाडे जवळपास तीन फूट उंचीची वाढल्यानंतर त्यांनी बागेची छाटणी केली आणि छाटणी केल्यानंतर जवळपास सात महिन्यांनी त्यांना यातून उत्पादन मिळू लागले.
पहिल्या वर्षी त्यांना या बागेतून एक लाख रुपयांची कमाई झाली होती. मात्र तदनंतर कमाईचा आकडा वाढला आहे. यावर्षी त्यांना पेरू बागेतून सात लाख रुपयांची कमाई झाली आहे. यातून दोन लाख रुपयांचा खर्च वजा केला असता त्यांना पाच लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे.
विशेष म्हणजे त्यांनी व्यापाऱ्यांना पेरू विक्री करण्याऐवजी स्वतः याची विक्री केली. यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. स्वतः विक्री केल्याने त्यांच्या पेरूला चांगला भाव मिळाला आहे.
पेरू पिकावर मिलीबग्ज, फुल किडे आणि मावा व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असतो यामुळे योग्य वेळी तज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी त्यांनी केली. तसेच झाडांना पेरू लागल्यानंतर या फळांना त्यांनी फोम, प्लास्टिक कागद तथा वर्तमानपत्राचा कागद लावला होता.
यामुळे फळांचे अळीपासून संरक्षण झाले. यामुळे चांगल्या दर्जाचे पेरू उत्पादित झाले. उत्पादित झालेल्या पेरूंना ग्राहकांच्या माध्यमातून चांगली पसंती मिळत असून त्यांना पेरू बागेतून वार्षिक सात लाख रुपयांची कमाई झाली आहे.