Farmer Success Story : तुम्ही कित्येकांच्या तोंडून शेतीचा व्यवसाय हल्ली परवडत नसल्याचे ऐकले असेल. किंबहुना कित्येकांनी शेतीचा व्यवसाय परवडत नसल्याने इतर उद्योगाकडे आपला मोर्चा वळवला आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि सुलतानी जुलूमशाही, सरकारचे उदासीन धोरण या अशा संकटांमुळे नवयुवक शेतकरी पुत्र देखील आता शेतीला प्राधान्य दाखवत नाहीत.
मात्र अशा या विपरीत परिस्थितीत असेही काही शेतकरी आहेत जे की आपल्या ज्ञानाच्या आणि मेहनतीच्या जोरावर शेतीमधून लाखोंची कमाई मिळवत आहेत. सांगली जिल्ह्यातील शेतकरी रामराव पाटील हे असेच एक प्रयोगशील शेतकरी आहेत.
रामराव यांनी 60 गुंठे शेतजमीनीत रताळ्याची लागवड करून अवघ्या काही महिन्यातच साडेसहा लाख रुपयांपर्यंतची कमाई मिळवली आहे. यामुळे सध्या रामरावांची पंचक्रोशीत चर्चा आहे. सेंद्रिय पद्धतीने रताळ्याची शेती करून रामरावांनी लाखोंची कमाई काढली असल्याने इतरांसाठी देखील त्यांचा हा प्रयोग मार्गदर्शक ठरत आहे.
रामराव हे जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील रहिवाशी आहेत. महत्त्वाचे म्हणजे रामराव हे इंजिनियर आहेत आणि एका खाजगी कंपनीत काम करतात. पण कामासोबतच त्यांनी त्यांच्या शेतीची आवड ही जोपासली आहे.
इंजिनीयर असून एका खाजगी कंपनीत चांगल्या पगारावर कामाला असूनही त्यांनी शेतीकडे दुर्लक्ष केले नाही. ते आपल्या शेतीत वेगवेगळ्या पिकांची लागवड करतात. ते पिकांची फेरपालट करत असल्याने त्यांना शेतीमधून चांगली कमाई मिळवता येत आहे.
यावर्षी त्यांनी मे महिन्यात 60 गुंठे जमिनीत रताळ्याची लागवड केली. त्यांच्या मित्राकडून त्यांनी रताळ्याचे बियाणे घेतले होते. मे महिन्यात त्यांनी तीन फुटी सरी घालून रताळ्याची लागवड केली. हे पिक तीन महिन्यांचे असून या पिकातून त्यांना ऑगस्ट महिन्यात उत्पादन मिळाले आहे.
साठ गुंठे जमिनीतून त्यांना तब्बल 9 टन उत्पादन मिळाले आहे. त्यांच्या मालाला प्रति टन 72 हजार रुपये एवढा दर मिळाला असून यातून त्यांना साडेसहा लाख रुपयांची कमाई झाली आहे. विशेष म्हणजे रताळ्याच्या शेतीसाठी फारसा खर्चही करावा लागत नाही.
म्हणजेच, दीड एकर जमिनीतून रामराव पाटील यांनी अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत तब्बल सहा लाख 50 हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. नक्कीच रामराव यांचा हा प्रयोग इतरांसाठी मोठा मार्गदर्शक ठरणार आहे.
शेतकऱ्यांनी जर शेतीमध्ये असेचं नवनवीन प्रयोग केले तर त्यांना शेतीचा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो, हेच पाटील यांच्या या प्रयोगातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.