Farmer Success Story : अलीकडे शेतीमध्ये मोठा बदल झाला आहे. पारंपारिक पिकांना बगल देत आता शेतकऱ्यांनी नगदी पिकांच्या लागवडीला प्राधान्य दिले आहे. यातून शेतकऱ्यांना मोठी कमाई देखील होत आहे. नवनवीन यंत्राचा आणि तंत्राचा देखील शेतीमध्ये उपयोग होऊ लागला आहे. काळाच्या ओघात शेतीमध्ये खूपच बदल झाला आहे.
मात्र आजच्या या संकरित शेतीमालाच्या जमान्यात पुणे जिल्ह्यातील एका महिला शेतकऱ्याने चक्क रानभाजी लागवडीतून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. खेड तालुक्यातील मौजे चिंबळी येथील प्रयोगशील महिला शेतकरी सीमा जाधव यांनीही सेंद्रिय पद्धतीने कर्टुले या रानभाजीची लागवड करून चक्क पावणेचार लाख रुपयांची कमाई केली आहे.
त्यामुळे सध्या जाधव यांची पंचक्रोशीत मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांनी अवघ्या चार महिन्यांच्या काळातच तीन लाख 75,000 ची कमाई केली आहे. सीमा जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात.
ते वेगवेगळ्या विदेशी भाजीपाल्याची लागवड करतात. ब्रोकोली, फॅमिली, पार्सली, रेड कॅमन यांसारख्या हॉटेलला चालणाऱ्या भाजीपाला आणि फळ भाजीपाल्याची लागवड करतात. विशेष म्हणजे यातून त्यांना चांगली कमाई देखील होते.
दरम्यान त्यांनी मे महिन्यात कर्टुले या रानभाजीची लागवड केली. या पिकाची लागवड केल्यानंतर अवघ्या 45 दिवसात त्यांना यापासून उत्पादन मिळाले. त्यांनी या पिकातून चार महिन्यांच्या काळात जवळपास 1500 किलो एवढे विक्रमी उत्पादन घेतले.
त्यांनी फक्त वीस गुंठ्यात या पिकाची लागवड केली होती आणि यातून त्यांना 1500 किलोचे दर्जेदार उत्पादन मिळाले. या पिकाला बाजारात 200 ते 250 रुपयाचा भाव मिळाला. यानुसार त्यांना चार महिन्यांच्या काळात तीन लाख 75 हजार रुपयांची कमाई झाली.
म्हणजे अर्धा एकर जमिनीत त्यांनी पावणे चार लाख रुपये तेही अवघ्या चार महिन्यांच्या काळात कमावलेत. त्यामुळे साहजिकच त्यांची मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे याची लागवड त्यांनी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली आहे.
म्हणजे यासाठी कोणत्याच औषधाचे फवारणी केली नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पिकाची एकदा लागवड केल्यानंतर तब्बल दहा ते बारा वर्षे त्यांना यातून उत्पादन मिळत राहणार आहे. यामुळे सीमा जाधव यांचा हा प्रयोग सुपरहिट ठरला असून इतर शेतकऱ्यांसाठी देखील हा प्रयोग खूपच प्रेरणा देणारा ठरणार आहे.