Farmer Success Story : शेतीचा व्यवसाय फार रिस्की आहे. या व्यवसायातून मिळेल तर फार मिळेल नाही तर मग मातीत टाकलेलं ही मातीत जाईल हे माहिती असूनही शेतकरी बांधव काळ्या आईची सेवा सुरूच ठेवतात. पेरलेलं उगवेलच याची शाश्वती नाही. पण काळ्या आईचा इमान राखत शेतकरी बांधव शेत जमीन कसतात.
असंख्य संकटांचा सामना करून शेतकरी बांधव शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रयोगाचा वापर करतात. या नवनवीन प्रयोगातून शेतकऱ्यांना काहीप्रसंगी चांगला फायदाही मिळतो. मराठवाड्यातील एका शेतकऱ्याने देखील शेती व्यवसायातील मोठ-मोठी आव्हाने पेलून आजच्या घडीला शेतीचा व्यवसाय हा फायद्याचा बनवून दाखवला आहे.
महत्त्वाचे म्हणजे कमी जमिनीतूनही लाखोंची कमाई काढली जाऊ शकते हे मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. बीड जिल्ह्यातील मौजे लोणगाव येथील पंडित चव्हाण यांनी फक्त 18 गुंठे जमिनीतून अडीच लाखांची कमाई काढून दाखवली आहे. यामुळे पंडित चव्हाण यांची त्यांच्या गावात आणि पंचक्रोशीत विशेष चर्चा सुरू आहे.
दरम्यान आज आपण चव्हाण यांचीच यशोगाथा थोडक्यात जाणून घेणार आहोत. चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार ते आधी पारंपारिक पिकांची लागवड करत असत. पारंपारिक पिकांची शेती मात्र त्यांना परवडत नव्हती यामुळे ते ऊसतोड कामगार म्हणूनही काम करत.
ते ऊस तोडणी साठी जात. मात्र आपण शेतीमध्ये काहीतरी वेगळे केले पाहिजे? जेणेकरून आपल्या परिवाराचे पोट आपल्याला भरता येईल, शेती मधून दोन पैसे शिल्लक राहतील असा विचार ते नेहमी करत असत. दरम्यान तीन वर्षांपूर्वी त्यांनी पालेभाज्या लागवडीचा निर्णय घेतला.
भाजीपाला अर्थातच तरकारी पिकाच्या शेतीमधून आपल्याला चांगले कमाई होऊ शकते असे त्यांना वाटले. यामुळे त्यांनी भाजीपाला शेतीचा निर्णय घेतला आणि तीन वर्षांपूर्वी त्यांच्या भाजीपाला शेतीचा प्रवास सुरू झाला. अवघ्या 18 गुंठे म्हणजेच अर्धा एकरापेक्षा कमी जमिनीत त्यांनी भाजीपाला शेतीचा हा प्रयोग सुरू केला.
भाजीपाला शेती सुरू केली मात्र सुरुवातीला त्यांना या प्रयोगातून फारसे उत्पन्न मिळाले नाही. मात्र त्यांनी हार मानली नाही आणि भाजीपाला शेती सुरूच ठेवली. पुढे मग त्यांना भाजीपाल्याच्या किरकोळ विक्रीतून चांगला नफा राहू लागला.
पंडित चव्हाण आपल्या जमिनीत मिरची, कोथिंबीर, भेंडी अशा विविध पालेभाज्यांची लागवड करत आहेत. या पालेभाज्यांच्या लागवडीतून त्यांना चांगली कमाई होत असून या शेतीमुळे ते आर्थिक दृष्ट्या सक्षम बनले आहेत.
पालेभाज्यांचे व्यवसायामध्ये चांगलं उत्पन्न मिळू लागल्याने त्यांनी ऊस तोडणीचे काम देखील सोडून दिले आहे. एक ऊसतोड मजूर म्हणून काम करणारे पंडित चव्हाण आज एक प्रयोगशील शेतकरी म्हणून आपल्या शेतीत मेहनत घेत आहेत आणि चांगले उत्पन्न मिळवत आहेत.
त्यांनी फक्त 18 गुंठ्यांमध्ये लावलेल्या पालेभाज्यांच्या पिकातून कमीत कमी अडीच लाखांपर्यंतचा नफा मिळवला आहे. म्हणजे कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळवता येते, हेचं चव्हाण यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते.