Farmer Success Story : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आता काळाच्या ओघात शेतीमध्ये मोठा बदल करत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी केलेला बदल त्यांच्यासाठी फायद्याचा ठरत आहे. अलीकडे शेतकरी बांधव पीकपद्धतीत मोठा अमूलाग्र बदल करत आहेत. आता राज्यातील शेतकरी बांधव अल्प कालावधीत आणि अल्प खर्चात काढणीसाठी तयार होणाऱ्या पिकांची शेती करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील भाजीपाला पिकाच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. विशेष म्हणजे या पठ्याने अवघ्या दहा गुंठ्यात एक लाखांची कमाई केली असल्याने सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याचे सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. शिरूर येथील राहुल किसन औटी या प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या भावासोबत आपल्या दहा गुंठे खडकाळ जमीनीवर काहीतरी जरा हटके करण्याचा प्रयत्न केला.
राहुल आणि सोमनाथ या दोन्ही बंधूनी अल्प कालावधीत आणि अल्प खर्चात काढण्यासाठी तयार होणाऱ्या वाल या पिकाची शेती करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने त्यांनी शेत जमिनीची उभी आडवी नांगरणी केली. नांगरणीनंतर वाफे तयार केले. त्यात वालाचे बियाणे लावण्यात आले. वाल पिकासाठी पाणी देणे हेतू ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करण्यात आला. यामुळे पाणी व्यवस्थापनात मदत झाली.
पाण्याचा अपव्यय टाळता आला शिवाय विद्राव्य खते देखील ठिबक सिंचन प्रणालीच्या माध्यमातून पिकाला मिळाली. वाल हे एक वेलीवर्गीय पीक आहे. म्हणून वाल पिकाची वेल वाढल्यानंतर राहुल यांनी लोखंडी तारा आणि लाकूड याचा वापर करून मंडप तयार केला. आणि वेल मंडपवर पसरवले. मध्यँतरी सातत्याने पाऊस कोसळत होता. यामुळे वाल पिकांवर मोठा विपरीत परिणाम झाला. मात्र त्यांनी योग्य त्या उपाययोजना करून वाल पिकाची चांगली जोपासना केली. वेळेवर कीटकनाशकाची फवारणी केली.
यासाठी त्यांना 15 हजाराचा खर्च आला. या दोन्ही बंधूंनी उत्पादित केलेल्या वाल पिकाला 60 ते 70 रुपये प्रति किलोचा बाजार भाव मिळत आहे. यामुळे त्यांना वाल पिकातून एक लाखांपर्यंतचा नफा मिळण्याची आशा आहे. मित्रांनो सोमनाथ औटी राजकारणात देखील सक्रिय आहेत. ते माजी उपसरपंच आहेत मात्र शेतीमध्ये देखील त्यांना मोठी आवड आहे. निश्चितच या दोन्ही बंधूनी शेतीमध्ये केलेली हीं कामगिरी कौतुकास्पद आहे.