Farmer Success Story : शेतीचा व्यवसाय हा अलीकडे फारच आव्हानात्मक झाला आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपिट, अवकाळी पाऊस अशा असंख्य संकटांमुळे शेतीमधून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. दुसरीकडे, या संकटांचा सामना करून शेतकऱ्यांनी जर चांगले उत्पादन मिळवले तर उत्पादित झालेल्या शेतमालाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही.
मात्र या अशा संकटांचा सामना करूनही काही शेतकरी बांधव शेतीमधून करोडो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे. जत या दुष्काळी तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून आर्थिक प्रगती साधली आहे. शशिकांत शिवाजीराव काळगी या प्रयोगशील शेतकऱ्याने दुष्काळी पट्ट्यात नंदनवन फुलवले असून ते आपल्या 50 एकर शेतीत भाजीपाला पिकाची शेती करत आहे.
भाजीपाला पिकातून ते वर्षाला आठ कोटी रुपयांची उत्पन्न घेत आहेत हे विशेष, त्यामुळे सध्या शशिकांत रावांची पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. जत तालुक्यातील रामपूर गावात शशिकांत रावांची शेती आहे. त्यांच्याकडे जवळपास 80 एकराहून अधिक बागायती शेती आहे.
त्यामध्ये ते विविध भाजीपाला पिकांची लागवड करतात. टोमॅटो आले सिमला मिरची हळद द्राक्ष अशा पिकांची ते आपल्या जमिनीत लागवड करतात आणि चांगले उत्पादन मिळवतात. ते जवळपास 40 एकर जमिनीवर शिमला मिरचीची लागवड करतात. रोपाची लागण झाल्यानंतर पाच महिन्यांत सिमला मिरचीचे पीक येते.
त्यानंतर त्याची तोड सुरू होते व बाजारपेठेत मिरची विकली जाते. यातून शशिकांत काळगी यांना किलोमागे ६२ ते ६५ रुपये मिळतात. सात महिन्यांत काळगी हे सिमला मिरचीचे पंधराशे टन उत्पादन घेतात. एकरी पन्नास टन उत्पन्न ते या पिकातून घेतात. मिरची लागवडीसाठी शेतात सत्तर महिला कामगार काम करतात. यासह त्यांनी एक व्यवस्थापकही ठेवला आहे.
शशिकांत शिमला मिरचीची विक्री वेगवेगळ्या राज्यांमध्ये करत आहेत. महाराष्ट्रातच नाही तर राज्याबाहेरही त्यांच्या सिमला मिरचीला मागणी आहे आणि यामुळे त्यांना या पिकातून चांगली कमाई होत आहे. फक्त शिमला मिरचीच नाही तर इतरही भाजीपाला पिकांतून त्यांना चांगली कमाई होते.
खरंतर शेती म्हणजे फक्त पोट भरण्यासाठी केला जाणारा व्यवसाय असा अनेकांचा समज आहे. मात्र, योग्य पद्धतीने शेतीचे नियोजन केले तर शेतीमधून करोडो रुपये कमावले जाऊ शकतात हे शशिकांत यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवले आहे.