Farmer Success Story : शेतीचा व्यवसाय अलीकडील काही वर्षांमध्ये आव्हानात्मक बनला आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतोय. अवकाळी, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट अशा असंख्य संकटांमुळे शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये. शिवाय उत्पादित झालेल्या मालाला बाजारात चांगला भाव मिळत नाहीये.
ही स्थिती संपूर्ण राज्यभर सारखीच आहे. नाशिक जिल्ह्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळते. कसमादे पट्ट्यात अर्थातच कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतोय.
या दुष्काळी परिस्थितीमुळे येथील शेतकऱ्यांना मनासारखे उत्पादन मिळत नाही. परंतु या विपरीत परिस्थितीमध्ये देखील कसमादे पट्ट्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी लाखोंच्या कमाईला हात घातला आहे. काहींनी तर कोट्यावधीच्या घरात कमाईची उड्डाणे नेली आहेत.
कसमादे पट्ट्यात डाळिंब, द्राक्ष यांसारख्या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यासोबतच कांद्याचे देखील मोठे उत्पादन होते. डाळिंबाबाबत बोलायचं झालं तर हा पट्टा डाळिंब उत्पादनासाठी विशेष लोकप्रिय आहे.
दरम्यान याच पट्ट्यातील सटाणा तालुक्यातील भाक्षी येथील युवा शेतकरी जगन्नाथ रौंदळ यांनी अवघ्या 30 गुंठे जमिनीतून लाखोंची कमाई काढली आहे. एमपीएससी मध्ये अपयश आल्यानंतर रौंदळ यांनी खचून न जाता काळ्या आईच्या सेवेचा निर्णय घेतला.
खरंतर रौंदळ यांचे वडील दुष्काळी परिस्थितीवर मात करत आत्तापर्यंत बैलगाडीने पाणी वाहून शेतीचे तहान भागवत आले आहेत. जगन्नाथ यांना देखील शेती करताना पाण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली.
जगन्नाथ यांनी आपल्या 30 गुंठे जमिनीत 300 डाळींबाची रोपे लावली आहेत. डाळिंबाची ही रोपे त्यांनी राहुरी येथून मागवलीत. डाळिंबाच्या रोपांची 12 बाय 12 या अंतरावर लागवड करण्यात आली.
लागवड केल्यानंतर दोन वर्ष सलग टँकरने पाणी आणून या झाडांची जोपासना केली. मात्र त्यांची ही मेहनत आणि यासाठी केलेला खर्च आता खऱ्या अर्थाने सार्थकी लागला आहे. कारण की त्यांनी लागवड केलेल्या डाळिंबाच्या बागेतून त्यांना चांगले विक्रमी उत्पादन मिळाले आहे.
अवघ्या 30 गुंठे जमिनीत लागवड केलेल्या डाळिंबाच्या पिकातून त्यांना तब्बल 9 टन एवढे दर्जेदार उत्पादन मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी उत्पादित केलेले डाळिंब हे खूपच उत्तम दर्जाचे असल्याने त्याला 157 रुपये किलो असा भावही मिळाला आहे.
यामुळे त्यांना या डाळिंबाच्या बागेतून तब्बल नऊ लाख 42 हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. एकंदरीत एमपीएससीत अपयश आल्यानंतरही न खचता त्यांनी शेतीमध्ये चांगली कामगिरी केली असून त्यांच्या या कामगिरीमुळे इतरांना देखील प्रेरणा मिळणार आहे.