Farmer Success Story : राज्यातील शेतकरी बांधव विविध पिकांची लागवड करत असतात. अलीकडे राज्यातील शेतकऱ्यांनी फळ पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. विशेष म्हणजे यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देखील मिळत आहे.
दरम्यान आज आपण अशाच एका मराठमोळ्या शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने डाळिंब लागवडीतून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे.
खरेतर डाळिंब या पिकाची पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात लागवड केली जाते. नाशिक, सांगली, पुणे, अहमदनगर इत्यादी जिल्हे डाळिंब उत्पादनासाठी ओळखले जातात.
नाशिक जिल्ह्याचा विचार केला असता जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा हे तालुके अर्थातच कसमादे पट्टा डाळिंब उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. याशिवाय, सांगली जिल्ह्यातील आटपाडी हा परिसर देखील डाळिंब उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो.
याच आटपाडी तालुक्यातील रुपेश गायकवाड या प्रयोगशील शेतकऱ्याने डाळिंबाच्या पिकातून तब्बल 43 लाख रुपयांची कमाई केली आहे. गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आटपाडी तालुका हा दुष्काळी भाग आहे.
मात्र या दुष्काळी भागात त्यांनी डाळिंबाच्या पिकातून चांगली कमाई केली आहे. त्यासाठी त्यांनी पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले. पावणेसहा एकर जमिनीत त्यांनी लागवड केलेल्या डाळिंबाच्या बागेतून यंदा आतापर्यंत 50 ते 60 टन माल मिळाला आहे.
विशेष म्हणजे या बागेतून आणखी 10 ते 12 टन एवढा माल निघणार अशी आशा त्यांना आहे. त्यांनी आत्तापर्यंत जेवढे डाळिंब विकले असेल त्यांना सरासरी 125 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला आहे.
दरम्यान जर शिल्लक राहिलेल्या मालाला देखील असाच विक्रमी भाव मिळाला तर त्यांना डाळिंबाच्या या बागेतून जवळपास 43 लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळेल अशी आशा आहे. विशेष बाब अशी की ही डाळिंब बाग जोपासण्यासाठी त्यांना जवळपास नऊ लाख रुपयांचा खर्च करावा लागला आहे.
अर्थातच नऊ लाख रुपयांचा खर्च करून त्यांना 43 लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. यामुळे गायकवाड यांची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली असून त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गायकवाड यांनी पावणे सहा एकर जमिनीत पाच हजार झाडे लावली आहेत. याच 5000 झाडांमधून त्यांना हे विक्रमी उत्पादन मिळाले आहे. निश्चितच या मराठमोळ्या शेतकऱ्यांचा प्रयोग परिसरातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देखील मोठी प्रेरणा देणारा राहणार आहे.