Farmer Success Story : अलीकडे शेतीचा व्यवसाय हा मोठा आव्हानात्मक बनला आहे. मात्र या आव्हानावर मात करत बळीराजा शेतीमधून चांगली कमाई करत असताना दिसतोय. दररोज अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा आपल्या कानावर येत असतात. अशीच एक यशोगाथा समोर आली आहे वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष या गावातून. येथील एका तरुण शेतकऱ्याने चक्क दीड एकरात तीस लाख रुपयांची कमाई केली आहे.
यामुळे सध्या या युवा शेतकऱ्याची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा आहे. दीड एकर जमिनीत आले लागवड करून या तरुण शेतकऱ्याने चांगले विक्रमी उत्पादन मिळवले आहे. त्याने उत्पादित केलेल्या मालाला चांगला दर मिळाला यामुळे हा शेतकरी चक्क लखपती झाला आहे.
सुहास राजाराम पवार असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. खरे तर कांद्याप्रमाणेच आल्याचे पीक देखील बेभरवशाचे समजले जाते. कधी यातून चांगली कमाई होते तर कधी यातून पिकासाठी आलेला खर्चही भरून काढता येत नाही.
मात्र असे असतानाही पवार यांनी गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने आल्याची लागवड केली आहे. याच जिद्द, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर आज त्यांना या आले पिकाने तारले आहे. पवार यांनी सांगितल्याप्रमाणे, आले पीक लागवड करण्यापूर्वी त्यांनी कंपोस्ट खत वापरले.
रासायनिक खतांचा आणि जैविक खतांचा बेसल डोस दिला. कंद कुजू नये म्हणून ट्रायकोडार्मा वापरला. आल्याची लागवड केली आणि लागवडीनंतरही योग्य पीक व्यवस्थापन करण्यात आले. योग्य पद्धतीने तण व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन करण्यात आले.
पाणी व्यवस्थापन देखील ठिबकने झाले. याचा परिणाम म्हणून त्यांना दीड एकर जमिनीतून तब्बल 30 टन एवढे उत्पादन मिळाले. उत्पादित झालेल्या मालाला त्यांना व्यापारी पहावा लागला नाही हे विशेष.
त्यांनी उत्पादित केलेले आले उच्च दर्जाचे असल्याने हे बियाणे म्हणून त्यांनी विकले. 110 रुपये प्रति किलो याप्रमाणे बियाणे म्हणून पवार यांचे संपूर्ण आले विक्री झाले. संपूर्ण आले त्यांनी बियाणे म्हणून पंचक्रोशीतील तथा इतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विकले आहे.
यातून त्यांना तब्बल 30 लाखांची कमाई झाली. एकंदरीत शेतीच्या व्यवसायात ज्याप्रमाणे काळाच्या ओघात बदल करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे संयमी राहणे देखील आवश्यक आहे.
संयम, जिद्द, सातत्य, मेहनत या साऱ्या गोष्टींची प्रतिपूर्ती झाल्यानंतर मग शेतीआई तुम्हाला भरभरून दान देत असते. युवा शेतकरी पवार यांचे उदाहरण याच गोष्टीला अधोरेखित करत आहे.