Farmer Success Story : अलीकडे अनेक शेतकरी पुत्र उच्च शिक्षण घेऊन मल्टिनॅशनल कंपनीत कामाला प्राधान्य देत आहेत. विशेष म्हणजे शेतकरी पालकांचे देखील आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घ्यावे आणि एखाद्या कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून नोकरी करावी असे स्वप्न आहे. मात्र, प्रत्येकालाच नोकरी मिळते असे नाही. त्यामुळे भारतात आणि राज्यात बेरोजगारीचा दर वाढला आहे.
नोकरीसाठी नवयुवक तरुण-तरुणी अहोरात्र काबाडकष्ट करत आहेत. पण अनेकांना आपली मनपसंत नोकरी मिळत नाही. दुसरीकडे देशात असेही अनेक नवयुवक शेतकरीपुत्र, शेतकरी कन्या आहेत ज्या की शिक्षणानंतर शेती करण्यास प्राधान्य देत आहेत.
विशेष म्हणजे हे नवयुवक शेतीमधून चांगली कमाई देखील करत आहेत. जालना जिल्ह्यातील एका युवा तरुणाने देखील शेतीमधून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. खरे तर मराठवाडा हा विभाग दुष्काळासाठी कुख्यात आहे.
तेथील दुष्काळ आणि सततची नापिकी यामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत आहे. मात्र, याच मराठवाड्यात एका युवा शेतकऱ्याने अवघ्या दीड एकर अद्रक पिकातून 30 लाख रुपयांची कमाई करून दाखवली आहे.
भारत पंढरीनाथ जाधव असे या युवा शेतकऱ्याचे नाव. जाफराबाद तालुक्यातील बोरगाव बुद्रुक हे त्यांचे गाव. जाधव हे गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत.
यामुळे त्यांना शेतीमधून चांगली कमाई होत आहे. यंदा त्यांनी आपल्या दीड एकर जमिनीत अद्रक लागवड केली होती. पीक लागवडीनंतर योग्य नियोजन केले, मेहनत घेतली आणि यामुळे त्यांना दीड एकर जमिनीतून तब्बल 350 क्विंटल अद्रकचे उत्पादन मिळाले आहे.
विशेष म्हणजे यातून त्यांना 30 लाख रुपयांची कमाई झाली आहे. ही कमाई नोकरदार वर्गापेक्षा देखील अधिक आहे. विशेष बाब म्हणजे फक्त दीड एकर जमिनीतूनच त्यांनी एवढी कमाई केली असल्याने सध्या त्यांची पंचक्रोशीत चर्चा आहे.
जाधव सांगतात की, त्यांना अद्रक शेतीमध्ये मागे एकदा तोटा आला होता. मात्र, त्यांनी अद्रक लागवड सोडली नाही. त्यांनी अद्रक शेती सुरूच ठेवली आणि यावर्षी त्यांना यातून 30 लाख रुपयांची कमाई झाली आहे.
या युवा शेतकऱ्याने शेतीमध्ये केलेली ही कामगिरी इतरांसाठी मोठी प्रेरक राहणार आहे. शेतीमध्ये जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तसेच यात सातत्य ठेवले तर शेतीचा व्यवसाय देखील फायदेशीर ठरू शकते हेच यातून अधोरेखित होत आहे.