Farmer Scheme : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरेतर भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेकडो योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न शासन करत आहे, यात शंकाच नाही.
मात्र, शेतकऱ्यांसाठी सुरू झालेल्या योजना या शेतकऱ्यांची मदत करण्याऐवजी शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत का ? असा सवाल मात्र शेतकऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने उपस्थित होत असतो. याचे कारण म्हणजे अनेकदा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी पायपीट करावी लागते.
केंद्र शासनाने सुरू केलेली किसान क्रेडिट कार्ड योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी की शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना झटपट कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य उद्देश आहे.
निश्चितच ही योजना कल्याणकारी आहे मात्र या योजनेच्या अंमलबजावणीची पद्धत ही खूपच क्लिष्ट असल्याने शेतकऱ्यांना या योजनेचा पाहिजे तसा फायदा होत नसल्याचे भीषण वास्तव आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेता आता किसान क्रेडिट कार्ड योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी केंद्रातील सरकारने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अगदी दहा मिनिटात कर्ज पुरवठा व्हावा या हेतूने केंद्र शासनाने एक पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे. या अंतर्गत आता शेतकऱ्यांना फक्त दहा मिनिटात दीड लाख रुपयांचे कर्ज विनाकारण उपलब्ध होऊ शकणार आहे.
ॲग्री स्टॅक नावाच्या एप्लीकेशनमधून शेतकऱ्यांना केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटात 1.50 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध होणार आहे. यासाठी देशातील दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष बाब अशी की, या दोन जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात अर्थातच बीड जिल्ह्यात आणि उत्तर प्रदेश राज्यातील फारुकाबाद जिल्ह्यात हा पायलट प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आहे.
केव्हा सुरु होणार पथदर्शी प्रकल्प ?
हा पायलट प्रोजेक्ट अर्थातच पथदर्शी प्रकल्प येत्या मे महिन्यापासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅक एप्लीकेशनच्या माध्यमातून अवघ्या दहा मिनिटात कर्ज मिळणार आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत हे कर्ज उपलब्ध होईल.
हे कर्ज शेतकऱ्यांना विनातारण पुरवले जाणार आहे. निश्चितच, एप्लीकेशनच्या माध्यमातून आता किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत अवघ्या एका क्लिकवर आणि दहा मिनिटात कर्ज पुरवठा होणार असल्याने याचा भविष्यात शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.