Farmer Scheme : येत्या 13 दिवसांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मंत्री महोदयांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात एक पोस्ट केली असून या पोस्टमध्ये 23 जुलैला केंद्राचा पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार असे म्हटले गेले आहे.
एकंदरीत केंद्रीय अर्थसंकल्पाची अधिकृत तारीख आता समोर आली आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर हा पहिलाच केंद्रीय अर्थसंकल्प राहणार आहे. हा अर्थसंकल्प पुन्हा एकदा अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी सादर करणार आहेत.
विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार असा दावा केला जात आहे. खरे तर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यावेळी अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही.
शेतकरी, सरकारी कर्मचारी, महिला, बेरोजगार तरुण अशा विविध घटकातील लोकांची नाराजी सरकारला जड भरली आहे. दरम्यान येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे.
यामुळे या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीप्रमाणे फटका बसू नये यासाठी येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा होतील असा दावा होत आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठीही अनेक घोषणा केल्या जाणार आहे.
पीएम किसान योजनेसंदर्भात देखील मोठा निर्णय घेतला जाणार अशा चर्चा सुरु आहेत. खरे तर, पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे.
याची सुरुवात 2019 मध्ये झाली असून तेव्हापासून आत्तापर्यंत ही योजना अविरतपणे सुरू आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. पात्र शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा एक हफ्ता याप्रमाणे एका वर्षात सहा हजार रुपये मिळतात. आत्तापर्यंत 17 हप्ते मिळाले आहेत.
दरम्यान आता या योजनेतून दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ होणार असे बोलले जात आहे. या योजनेअंतर्गत आता एका वर्षाला आठ हजार रुपयांची मदत मिळू शकते असा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे याबाबतचा निर्णय हा केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये होणार असे म्हटले जात आहे.
परंतु या संदर्भात अजूनही केंद्रातील सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे खरंच सरकार या संदर्भात सकारात्मक निर्णय घेणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
पण लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला असल्याने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकार हा निर्णय घेणार अशी दाट शक्यता आहे. यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.