Farmer Scheme : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात शेतीसोबतच दुधाचा धंदा देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. दिवसेंदिवस पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. अनेकजण आता शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करत आहे. मात्र पशुपालनाचा व्यवसाय शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे चित्र आहे. दुधाचा व्यवसाय अलीकडे शेतकऱ्यांना डोईजड ठरू लागला आहे.
एक तर पशुखाद्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. याशिवाय इंधनाचे दर, मजुरीचे दर देखील वाढत चालले आहे. दुसरीकडे दुधाला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. सोबतच लंपी सारख्या आजाराचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे आता दुधाचा धंदा रिस्की बनला आहे.
अशा परिस्थितीत राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. गाईच्या दुधासाठी राज्य शासनाने पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. याचा शासन निर्णय चार तारखेला निर्गमित झाला आहे.
खरेतर सुरुवातीला निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार फक्त सहकारी दूध उत्पादक संघाकडे दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांनाच हे अनुदान दिले जाणार होते.
पण सहकारी दूध उत्पादक संघांऐवजी खाजगी दूध उत्पादक संघांकडे मोठ्या प्रमाणात दूध संकलन होत आहे.त्यामुळे खाजगी दूध संघांनाही अनुदान मिळाले पाहिजे अशी मागणी केली जात होती.
याच मागणीच्या पार्श्वभूमीवर 5 जानेवारी 2024 ला राज्य शासनाने एक नवीन शासन निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये सहकारी दूध संघासोबतच खाजगी दूध संघांनाही अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे खाजगी दूध संघाकडे दूध देणाऱ्या दूध उत्पादकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. पण या शासन निर्णयात गाईच्या दुधाचे दर कमी करण्यात आले आहे.
खरे तर गाईच्या दुधाला 29 रुपये प्रति लिटर एवढा दर दिला जाईल असे हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले होते.
मात्र काल निर्गमित झालेल्या शासन निर्णयात दुधाला 27 रुपये प्रति लिटर एवढा दर देणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांना ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ या गुणप्रतिकरिता किमान २७ रुपये प्रतिलिटर दर संबंधित उत्पादकाच्या बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने जमा करणे बंधनकारक राहणार आहे.
त्यानंतर राज्य सरकारमार्फत पाच रुपये ऑनलाइन डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे. ३.५ फॅट आणि ८. ५ एसएनएफ गुणप्रतिपेक्षा प्रतिपॉइंट कमी होणाऱ्या फॅट व एसएनएफ करिता ३० पैसे वजावट करण्यात येणार आहे. तर प्रतिपॉइंट वाढीकरिता ३० पैसे वाढ करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे राज्यातील दूध उत्पादकांना निश्चितच मिळणार आहे. पण दुधाचा दर कमी गेला असल्याने शेतकऱ्यांमध्ये थोडी नाराजी सुद्धा आहे. हा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.