Farmer Scheme : गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकरी बांधव विविध संकटांमुळे भरडले जात आहेत. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट, कमी पाऊस, जास्तीचा पाऊस आणि अधिकची उष्णता अशा वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
गेल्या वर्षी खरीप हंगामात कमी पावसामुळे आणि रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अशातच मात्र राज्यातील काही शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
ही बातमी जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची ठरणार आहे. खरंतर जळगाव जिल्हा हा केळीचे आगार म्हणून ओळखला जातो. येथील केळीला जीआय टॅग देखील मिळाला आहे.
जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे केळी पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. मात्र केळी हे खूपच संवेदनशील पीक आहे. हवामानातील बदलाचा केळी पिकावर मोठा परिणाम होत असतो.
दरम्यान एप्रिल महिन्यात जिल्ह्यात सलग पाच दिवस ४२ डिग्रीपेक्षा जास्तीच्या तापमानाची नोंद करण्यात आली होती. यामुळे जळगाव जिल्ह्यातील ७५ महसूल मंडळातील केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे केळी उत्पादक संकटात सापडले आहेत.
केळी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार असा दावा खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे.
यामुळे सदर केळी उत्पादकांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे. पिक विमा कंपन्यांकडून अधिकच्या उष्णतेमुळे झालेल्या नुकसानीपोटी नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
खासदार खडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार केळी उत्पादक शेतकऱ्यांचे जर कमी तापमानामुळे नुकसान झाले तर हेक्टरी 26500 आणि जास्त तापमानामुळे जर नुकसान झाले तर हेक्टरी 36 हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जात असते.
ज्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी फळ पिक विमा काढलेला असेल त्यांना याचा लाभ मिळणार आहे. फळ पिक विमा योजनेच्या निकषासनुसार एक नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीत जर सलग तीन दिवस पारा 8 अंश किंवा त्यापेक्षा कमी वर गेला तर हेक्टरी 26500 रुपयांची मदत मिळते.
जर समजा मार्च व एप्रिल महिन्यात सलग पाच दिवस पारा 42 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक राहिला तर अशावेळी केळी उत्पादकांना हेक्टरी 36 हजार रुपयांची मदत मिळते. जर मे महिन्यात सलग 3 दिवस पारा 44° c पेक्षा अधिक राहिला तर अशावेळी केळी उत्पादकांना हेक्टरी 44000 ची मदत मिळते.