Farmer Scheme : येत्या काही दिवसात मानसून भारताच्या मुख्य भूमीत दाखल होणार आहे. त्यानंतर तो आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य भूमीत येणार आहे. यंदा 31 मे ला मान्सून केरळात येणार अशी शक्यता आहे. तसेच यावर्षी 10 जूनच्या सुमारास मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होऊ शकते असे बोलले जात आहे. अर्थातच आता लवकरच मोसमी पावसाला सुरुवात होणार आहे.
मोसमी पावसाला सुरुवात झाल्यानंतर खरीप हंगामातील पीक पेरणीला देखील वेग येणार आहे. सध्या राज्यभरातील शेतकरी बांधव खरीप हंगामासाठी शेतीची पूर्व मशागत करत आहे. पूर्व मशागतीसाठी आणि बी बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ पाहायला मिळत आहे.
अशातच राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका कृषी विभागाने खरीप हंगामासाठी विविध पिकांचे बियाणे वाटप करण्यासाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खरंतर दरवर्षी राज्यातील कृषी विभागाच्या माध्यमातून पिक प्रात्यक्षिकांतर्गत व प्रमाणित बियाणे योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून दिले जात असते. यासाठी मात्र शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो.
यावर्षी देखील शेतकऱ्यांना बियाण्यासाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाडीबीटीवर अर्ज केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची पीक प्रात्यक्षिकमध्ये निवड होईल त्या शेतकऱ्यांना एका एकरासाठी लागणारे बियाणे मोफत दिले जाणार आहे.
तसेच, प्रमाणित बियाणे वितरण योजनेत निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या अर्ज केलेल्या क्षेत्रानुसार जास्तीत जास्त ५ एकर क्षेत्रासाठी लागणारे बियाणे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
म्हणजेच काही शेतकऱ्यांना एक एकर साठी लागणारे बियाणे मोफत दिले जाणार आहे तर काही शेतकऱ्यांना पाच एकर क्षेत्रासाठी लागणारे बियाणे 50 टक्के अनुदानावर मिळणार आहे. दरम्यान, बियाण्यासाठी शेतकऱ्यांना लवकरात लवकर अर्ज करावा असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर इच्छुक शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जवळील सीएससी सेंटरवर जाऊन अर्ज करायचा आहे. शेतकऱ्यांना जे बियाणे लागणार आहे त्या बियाण्यासाठी अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी शेतकरी बांधवांना सातबारा उतारा, आठ अ उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक अशा काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता मात्र करावी लागणार आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी बियाणे वाटप होणार आहे.