Farmer Scheme : देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. राज्य शासन देखील शेतकरी बांधवांसाठी अनेक योजना राबवत आहे. या कल्याणकारी शेतकरी हिताच्या योजनांमुळे शेतीचा व्यवसाय हा सोयीस्कर झाला आहे. या योजनांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
शेतकऱ्यांसाठी सुरू झालेल्या अशा असंख्य योजनांपैकी एक योजना आहे किसान क्रेडिट कार्ड. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहजतेने कर्ज मंजूर होते, असा दावा सरकारने केलेला आहे. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती काही औरच आहे.
किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना बँकांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. आता मात्र शेतकऱ्यांची किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जासाठीची होणारी पायपीट पूर्णपणे संपणार आहे.
कारण की आता किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अवघ्या दहा मिनिटात कर्ज मंजूर होऊ शकणार आहे. हे कर्ज ऍग्री स्टॅक या एप्लीकेशनच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटात बँकेकडून मंजूर होऊ शकते.
याबाबतचा एक पायलट प्रोजेक्ट केंद्र शासनाने देशातील फक्त दोन जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या दोन जिल्ह्यात आपल्या महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचा समावेश आहे हे मात्र विशेष.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात अर्थातच बीड जिल्ह्यात आणि उत्तर प्रदेश राज्यातील फारुकाबाद या जिल्ह्यात हा प्रयोग राबवला जाणार आहे. हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रयोग येत्या मे महिन्यापासून राबवला जाणार आहे.
या अंतर्गत यासंबंधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ॲग्री स्टॅक एप्लीकेशनच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटात बँकेकडून दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण मंजूर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता आपण ही प्रक्रिया नेमकी कशी राहणार हे थोडक्यात पाहणार आहोत.
कशी राहणार कर्ज वितरणाची प्रक्रिया
यासाठी सर्वप्रथम ऍग्री स्टॅक हे एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल. एप्लीकेशन डाउनलोड झाल्यावर मग शेतकऱ्यांना नाव आणि आधार क्रमांक टाकून ओटीपीतून पडताळणी करावी लागणार आहे.
मग फेस आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची ओळख पटवली जाणार आहे. मग शेतकऱ्यांना कर्ज हवे असल्यास तशी माहिती भरावी लागणार आहे. यानंतर शेतकऱ्याचे खाते असलेल्या बँकेच्या कर्जाची ऑफर शेतकऱ्यांना डिस्प्ले होईल.
मग या ऑफरपैकी एक ऑफर सिलेक्ट करून यावर दहा मिनिटात प्रक्रिया होईल आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा होईल. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक लाख 60 हजार रुपयांपर्यंतची कर्जाची रक्कम विनातारण उपलब्ध होणार आहे.