Farmer Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन देखील शेतकऱ्यांसाठी अनेक कौतुकास्पद योजना राबवत असून फळबाग लागवडीसाठी देखील राज्य शासनाने अशीच एक कौतुकास्पद योजना सुरू केली आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना असून या अंतर्गत विविध फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जात आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आंबा, पेरू, संत्रा, कागदी लिंबू, मोसंबी, सीताफळ, आवळा, डाळिंब आदी फळपीक लागवडीसाठी भरघोस अनुदान दिले जात आहे. ही योजना केवळ वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली असून या अंतर्गत आतापर्यंत असंख्य शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे.
दरम्यान आज आपण या योजनेसाठी शेतकऱ्यांनी कुठे अर्ज करायला हवा आणि या अंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्या फळबागेसाठी किती अनुदान मिळते या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शेतकऱ्यांना किती अनुदान मिळते?
आंबा फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून ७१९९७ रुपये, पेरू पिकासाठी 77 हजार 692 रुपये, संत्रा आणि मोसंबी पिकासाठी 89 हजार 275 रुपये, कागदी लिंबू साठी ७२,६५५ रुपये, आवळ्यासाठी 63,640, सिताफळ पिकासाठी 91251 आणि डाळिंब बागेसाठी एक लाख 26 हजार 321 रुपये एवढे अनुदान दिले जात आहे.
या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानाची रक्कम मात्र शेतकऱ्यांना एकाच हप्त्यात मिळत नाही. म्हणजेच ही रक्कम एकाच वेळी न देता टप्प्याटप्प्याने दिली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी अनुदानाची रक्कम एकूण तीन टप्प्यात दिली जाते.
या योजनेंतर्गत फळपिकाला तीन वर्षात अनुक्रमे ५०, ३० व २० याप्रमाणे अनुदान वाटप होते. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.
कुठं अर्ज करणार ?
फळबागांचे क्षेत्र वाढावे, शेतकरी सक्षम व्हावा या हेतूने महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून ही कल्याणकारी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेणेकरिता नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे. https://mahadbtmahait.gov.in/ या संकेत स्थळावर जाऊन शेतकऱ्यांना अर्ज सादर करता येणार आहे.