Farmer Scheme : महाराष्ट्र हे एक शेतीप्रधान राज्य आहे. राज्याची बहुतांशी जनसंख्या ही उदरनिर्वाहासाठी शेती करत आहे. अशा स्थितीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना कार्यान्वित केल्या जात आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना शेती करणे सोयीचे व्हावे आणि त्यांच्या उत्पादनात दुपटीने वाढ व्हावी या उद्दिष्टाने राज्य शासनाने आतापर्यंत शेकडो योजना राबवल्या आहेत.
यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना याचा देखील समावेश होतो. ही योजना राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक स्वप्नातील योजना आहे.
या योजनेअंतर्गत शासनाचा शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. याअंतर्गत सब स्टेशन जवळ असलेल्या जमिनीवर सौर प्रकल्प विकसित केला जात आहे. अशा प्रकल्पातून जी वीज निर्मिती होईल ती वीज शेतीसाठी वापरण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
दरम्यान या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा 12 घंटे शेतीसाठी वीज उपलब्ध होणार असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार बोलून दाखवला आहे.
विशेष बाब अशी की, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज तर उपलब्ध होणारच आहे शिवाय यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा एक मार्ग देखील मिळणार आहे.
कारण की, या योजनेअंतर्गत विकसित होणाऱ्या सौर प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्त्वावर घेण्याचे देखील प्रावधान आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पडीक आहेत अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना निश्चितच फायदेशीर ठरू शकते.
सब स्टेशन पासून तीन किलोमीटरच्या परिघात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत अशा शेतकऱ्यांच्या तीन एकर पासून ते दहा एकर पर्यंतच्या जमिनी या प्रकल्पासाठी वापरल्या जाणार आहेत.तसेच या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना वार्षिक आधारावर भाडे मिळणार आहे.
या भाडेतत्त्वावर घेतल्या जाणाऱ्या जमिनीसाठी एकरी तीस हजार रुपये एवढे भाडे आधी ठरवण्यात आले होते. आता मात्र शासनाच्या माध्यमातून सौर प्रकल्पासाठी घेतल्या जाणाऱ्या जमिनीकरिता एकरी 50 हजार रुपये एवढे भाडे दिले जाणार आहे.
त्यामुळे सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे आणि काही पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी भाड्यावर देऊन एकरी 50 हजार रुपयांपर्यंतची कमाई देखील करता येणार आहे.
दरम्यान इच्छुक शेतकऱ्यांना या योजनेसाठी भाडेतत्त्वावर जमिनी देण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या माध्यमातून केले जात आहे.