Farmer Scheme : राज्यातील शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वत उपलब्धता व्हावी यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे बनवण्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे.
दरम्यान आता शेततळे साठी लॉटरी पद्धत बंद करण्यात आली असून अर्ज केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना आता अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. आता शेततळ्यासाठी असलेली लॉटरी पद्धत बंद होणार आहे.
निश्चितच शासनाने घेतलेला हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा सिद्ध होणार आहे. दरम्यान आज आपण मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे साठी काय पात्रता शासनाने ठरवल्या आहेत आणि यासाठी किती अनुदान शेतकऱ्यांना मिळते याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
शेततळे योजनेअंतर्गत लाभासाठीच्या पात्रता
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी शासनाने काही पात्रता निश्चित केल्या आहेत. हा लाभ केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे यामुळे सदर शेतकरी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा. अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असावी. किमान 0.40 हेक्टर क्षेत्र अर्जदार शेतकऱ्यांच्या नावावर असेल तरच तो या योजनेसाठी पात्र ठरेल.
तसेच सदर अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रीकदृष्टया योग्य असावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकिय योजनेतून शेततळे या घटकाकरिता लाभ घेतलेला नसावा.
शेततळ्यासाठी किती अनुदान मिळते ?
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी आकारमानानुसार अनुदान दिले जाते. यात लाभार्थी शेतकऱ्याला आकारमानानुसार 28 हजारापासून ते 75000 पर्यंतचे अनुदान मिळते.
यामध्ये 15 बाय 15 च्या शेततळ्यासाठी 28 हजार 275, 20 बाय 15 च्या शेततळ्यासाठी 31 हजार 598 रुपये, 20 बाय 20 च्या शेततळ्यासाठी 41 हजार 218 रुपये, 25 बाय 20 च्या शेततळ्यासाठी 49 हजार 671, 25 बाय 25 च्या शेततळ्यासाठी 58,700, 30 बाय 25 च्या शेततळ्यासाठी 67,528, 30 बाय 30 च्या शेततळ्यासाठी 75,000 चे अनुदान मिळणार आहे.
कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार?
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यात अर्जदार शेतकऱ्याचा जमिनीचा सात-बारा उतारा लागतो. अर्जदार शेतकऱ्याचे आधारकार्ड, बॅंक पासबुक आणि हमीपत्र, मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला यांसारखी काही महत्वाची कागदपत्रे सदर शेतकऱ्याला सादर करावी लागणार आहेत.