Farmer Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी तसेच शेतीशी निगडित उद्योगधंद्यांमध्ये सक्रिय व्यावसायिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांचे आणि शेती क्षेत्राचे हित जोपासण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. केंद्र शासनाने 2021-22 या वर्षापासून उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान ही योजना राबवण्यास सुरुवात केली आहे.
ही योजना पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबवली जात असून या अंतर्गत विविध बाबींसाठी अनुदान दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना शेळी- मेंढी पालन, कुक्कुट पालन, वराह पालन यासाठी अनुदान मिळत आहे.
एवढेच नाही तर या अभियानाच्या माध्यमातून पशुखाद्य व वैरण विकास उपअभियांनांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन यासाठी देखील अनुदान दिले जात आहे.
यामुळे शेतकरी पुत्रांना शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करताना मोठा फायदा होत आहे. या अनुदानामुळे शेती पूरक व्यवसाय सहजतेने सुरू केले जाऊ शकतात.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तब्बल 50 टक्क्यांपर्यंतचे अनुदान मिळत आहे. दरम्यान आता आपण या योजनेअंतर्गत कोणत्या बाबीसाठी किती अनुदान मिळते हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
किती अनुदान मिळणार?
मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत शेळी मेंढी पालनासाठी 50 लाख, कुक्कुट पालनासाठी 25 लाख, वराह पालनासाठी 30 लाख तसेच पशुखाद्य व वैरण विकास यासाठी 50 लाख रुपये एवढे कमाल अनुदान दिले जात आहे.
मात्र अनुदानाची ही कमाल मर्यादा आहे. यापेक्षा जास्तीचे अनुदान या अंतर्गत उपलब्ध होणार नाही. तसेच या अंतर्गत अनुदानाव्यतिरिक्त लागणारी उर्वरित रक्कम ही शेतकऱ्यांना स्वतः उपलब्ध करावी लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना कर्ज देखील मिळू शकते.
कोणाला मिळणार लाभ ?
केंद्र शासनाच्या या योजनेचा लाभ देशातील सर्वच राज्यांमधील नागरिकांना मिळणार आहे. याचा लाभ हा व्यवसायीक, स्वंय सहाय्यता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्या, सहकारी दुध उत्पादक संस्था, सह जोखिम गट (जेएलजी), सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्टअप ग्रुप इत्यादी घटकांना दिला जाणार आहे.