Farmer Scheme : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र महाराष्ट्रात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. सर्वाधिक फटका उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात बसला.
मराठवाडा आणि अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील महायुतीच्या अनेक उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र लोकसभेचे हे चित्र विधानसभेत बदलायचे या उद्देशाने महायुती सरकार कामाला लागली आहे.
या पार्श्वभूमीवर पराभूत झालेल्या जिल्ह्यांमध्ये महायुती सरकारने विशेष लक्ष घातले आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा काबीज करण्यासाठी सर्वसामान्य मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.
याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, लाडका भाऊ योजना अशा विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यातल्या त्यात आता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीही एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्या जनसन्मान यात्रा निमित्ताने नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज मोठी घोषणा केली. कृषीमंत्र्यांनी जिल्ह्यातील पिक विमा धारक शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट आधीच विम्याचे पैसे वितरित केले जातील अशी घोषणा केली आहे.
यामुळे जिल्ह्यातील सहा लाख पिक विमा धारक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. खरे तर गेल्यावर्षी अर्थातच 2023 च्या खरीप हंगामात पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या लाखो शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नाहीये.
यामुळे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर विम्याची रक्कम मिळावी अशी मागणी जोर धरत आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान आता हा पाठपुरावा यशस्वी झाला आहे. नाशिक दौऱ्यावर असताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली.
यावेळी शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाआधारे आणि उत्पन्नात आलेली घट या आधारित देय असणारा ८५३ कोटी रुपयांचा पिक विमा प्रलंबित असल्याची बाब कृषिमंत्री महोदयांच्या कानावर टाकली गेली.
यानंतर कृषिमंत्री महोदयांनी ताबडतोब संबंधित कंपनीच्या राज्यप्रमुखांशी संपर्क केला आणि शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश दिलेत.
यावेळी मुंडे यांनी ही रक्कम 31 ऑगस्ट च्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अशी घोषणा केली आहे. कृषिमंत्र्यांच्या या आदेशानुसार आता जिल्ह्यातील जवळपास ५ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ८५३ कोटी रुपये एवढी विमा रक्कम मिळणार आहे.