मंडळी, दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षात एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच थकीत दूध अनुदान मिळणार आहे, कारण की दूध अनुदान वितरित करण्यासाठी राज्य शासनाकडून 758 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. खरे तर राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे अनुदान देण्यात आले होते. मात्र त्यापुढील अनुदान थकीत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दूध अनुदान रखडले होते आणि यामुळे दूध उत्पादक मोठ्या संकटात आलेत. पण आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल कारण आता दूध अनुदानासाठी सरकारने निधी मंजूर केला आहे. दूध अनुदान योजनेसाठी फडणवीस सरकारने 758 कोटी रुपये मंजूर केलेत, पण प्रत्यक्षात दूध अनुदानाची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात कधी जमा होणार, लाभार्थ्यांना किती महिन्यांचे पैसे मिळणार ? याबाबतची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
मंडळी एकीकडे पशुधन सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागत आहे, पशुखाद्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत, इंधनाचे दर आणि महागाई वाढत चालली आहे मात्र दुधाचे दर सातत्याने कमी होत आहेत. विशेषता गाईच्या दुधाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी अनुदान दिले गेले पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली होती.
याच मागणीच्या अनुषंगाने गेल्या शिंदे सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर प्रमाणे अनुदान देण्याची घोषणा केली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने तत्कालीन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध अनुदान योजना सुरू केली. या अंतर्गत गाईच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये दुध देण्याची घोषणा करण्यात आली.
जेव्हापासून ही योजना जाहीर झाली आहे तेव्हापासूनच या योजनेची राज्यात चर्चा सुरू आहे. दूध अनुदान योजनेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय हे नक्कीच, पण ऑक्टोबर पासून ही योजना रखडली आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर फक्त या तीन महिन्यांचे पैसे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. यामुळे या योजनेअंतर्गत पुढील महिन्याचे पैसे मिळणार की नाही? हा सवाल उपस्थित केला जात होता.
मात्र आता या योजनेसाठी राज्य सरकारने 758 कोटी रुपयास मान्यता दिलेली आहे. मात्र अजून निधी प्राप्त झालेला नाही यामुळे जेव्हा हा निधी संबंधित विभागाकडे वर्ग होईल त्यानंतर याचे वाटप केले जाणार आहे. दुग्ध व्यवसाय आयुक्त प्रशांत मोहोड यांनी ही माहिती दिली. शासकीय आकडेवारीनुसार, जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे आत्तापर्यंत 537 कोटी 85 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आलय.
६ लाख २२४ शेतकऱ्यांच्या खात्यात ही अनुदानाची रक्कम जमा झाली आहे. दरम्यान पुढील तीन महिन्यांसाठी म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांसाठी राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात 758 कोटी रुपये मंजूर केले आहेत. अजून ही मंजूर झालेली रक्कम संबंधित विभागाकडे आलेली नाही मात्र लवकरच ही रक्कम वर्ग होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान येणार आहे.
अर्थातच येत्या काही दिवसांनी अनुदान प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने दूध अनुदानाची रक्कम पाच रुपयांवरून सात रुपये केली जाईल अशी घोषणा केली होती. यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांचे दूध अनुदान पाच रुपयांप्रमाणे मिळणार की सात रुपयांप्रमाणे हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.