Farmer Scheme : पावसाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दशकांचा विचार केला असता शेतीचा व्यवसाय हा आव्हानात्मक बनला आहे.
हा व्यवसाय आव्हानात्मक बनण्याचे कारण म्हणजे नैसर्गिक संकट. विविध नैसर्गिक संकटांचा सामना करून शेतकऱ्यांना आता शेतीचा व्यवसाय करावा लागत आहे.
यामुळे रक्ताचे पाणी करूनही शेतीमधून अपेक्षित अशी कमाई होत नाहीये. परिणामी, अनेक शेतकरी बांधव कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट, दुष्काळ अशा असंख्य संकटांमुळे शेतीचा व्यवसाय शेतकऱ्यांना परवडत नाहीये.
गेल्या वर्षी अर्थातच जून ते सप्टेंबर 2023 या मान्सून काळात महाराष्ट्रात अपेक्षित असा पाऊस झाला नाही. शिवाय डिसेंबर 2023 आणि जानेवारी 2024 महिन्यात राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली.
यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर व नाशिक विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून निधी मागणीचे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आले.
दरम्यान, नागपूर व नाशिक विभागीय आयुक्तांनी पाठवलेल्या या प्रस्तावानुसार शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून नागपूर व नाशिक विभागीय आयुक्तांनी पाठवलेल्या प्रस्तावानुसार संबंधित बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर केली आहे.
डिसेंबर 2023 आणि जानेवारी 2024 यावेळी झालेल्या अवेळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2467.37 लक्ष एवढा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने अर्थात 4 मार्च 2024 ला मंजुरी दिली आहे.
अर्थातच आता या संबंधित शेतकऱ्यांना 24 कोटी 67 लाख 37 हजाराचा निधी वितरित होणार आहे. या अंतर्गत नाशिकमधील बाधित 52 शेतकऱ्यांसाठी चार लाख 70 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता मिळाली आहे.
तसेच भंडारा येथील 5388 शेतकऱ्यांसाठी पाच कोटी 89 लाख 65 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नागपूर जिल्ह्यातील चार हजार 432 शेतकऱ्यांसाठी देखील सहा कोटी 64 लाख 18 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजूर करण्यात आला आहे.
तसेच गोंदिया जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी 12 कोटी आठ लाख 84 हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.