Farmer Scheme : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाची निम्म्या हून अधिक जनसंख्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर आधारित आहे. यामुळेच आपल्या देशाला शेतीप्रधान देशाचा टॅग मिळाला आहे. हेच कारण आहे की केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत.
या योजनांच्या माध्यमातून राज्यासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता राज्यातील शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप अन कापूस साठवण्यासाठीची बॅग शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार आहे.
खरे तर राज्यात कापूस आणि सोयाबीन सारख्या तेलबिया पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या तेलबिया पिकांचे उत्पादन वाढावे यासाठी शासनाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून देखील तेलबिया पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा आणि वेगवेगळ्या वाणाचा शोध लावला जात आहे. दुसरीकडे आत्ता सरकारने तेलबिया पिकांच्या उत्पादन वाढीसाठी बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप आणि कापूस साठवणुकीसाठीची बॅग अनुदानावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे या दोन्ही वस्तूंसाठी सरकारकडून 100% अनुदान मिळणार आहे. यामुळे या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील सरकारने शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकाला चालना देण्यासाठी ही नवीन योजना आणलेली आहे.
ही योजना राज्याच्या कृषी विभागामार्फत राबविले जात आहे. या अंतर्गत फवारणी पंपासाठी आणि कापूस साठवणुकीच्या बॅगेसाठी शंभर टक्के अनुदान मिळणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे हे विशेष. 6 ऑगस्ट पासून म्हणजेच आजपासून या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
ही अर्ज प्रक्रिया संपूर्ण महिनाभर सुरू राहणार आहे. या योजनेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत इच्छुक शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. यासाठी महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांना कापूस साठवणूक बॅग साठी अर्ज करायचा असेल त्या शेतकऱ्यांनी बियाणे औषधे आणि खते या बाबीअंतर्गत अर्ज करायचा आहे. तसेच ज्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी कृषी यांत्रिकीकरण या टाइल्स अंतर्गत लवकरात लवकर अर्ज सादर करायचा आहे.