Farmer Government Scheme : शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने सुद्धा वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत.
यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना, पीएम किसान मानधन योजना यांसारख्या अनेक योजनांचा समावेश होतो. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये पुरवले जातात.
तसेच पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना म्हातारपणात पेन्शन देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून पेन्शन मिळते तशीच पेन्शन या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळू शकते.
यासाठी मात्र सुरुवातीला शेतकऱ्यांना काही पैसे गुंतवावे लागतात. वयोमानानुसार शेतकऱ्यांना 55 रुपयांपासून ते दोनशे रुपये प्रति महिना पर्यंतची गुंतवणूक करावी लागते. 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात.
जें शेतकरी बांधव या योजनेत सहभाग घेतात आणि योजनेसाठी आवश्यक असलेल्या पैशांची गुंतवणूक करतात त्यांना 60 वर्षानंतर 3000 रुपये प्रति महिना एवढे मानधन दिले जाते. म्हणजेच वार्षिक 36 हजार रुपयांपर्यंतची रक्कम या योजनेअंतर्गत मिळते. आता आपण या योजनेची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
योजनेसाठी आवश्यक पात्रता काय ?
या योजनेसाठी केवळ भारतातील शेतकरीchपात्र ठरणार आहे. १८ ते ४० वयोगटातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
दोन हेक्टर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
किती पैसे जमा करावे लागतात
या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी सुरुवातीला काही पैसे जमा करावे लागतात. शेतकऱ्यांना अगदी नाममात्र रक्कम जमा करावी लागते आणि वयाच्या 60 वर्षानंतर त्यांना तीन हजार रुपये मासिक पेन्शन मिळते.
या योजनेमध्ये जे शेतकरी वयाच्या 18 व्या वर्षी सहभाग नोंदवतील त्यांना दरमहा 55 रुपये, जर शेतकऱ्यांनी 30 व्या वर्षी या योजनेत सहभाग नोंदवला तर 110 रुपये आणि वयाच्या 40 व्या वर्षी या योजनेत सहभाग नोंदवला तर 200 रुपये दर महिन्याला जमा करावे लागणार आहेत. वयाच्या ६० वर्षापर्यंत ही रक्कम भरावी लागणार आहे.
मिळणार प्रत्येक महिन्याला तीन हजाराची पेन्शन
60 वर्षानंतर या योजनेत अर्ज सादर केलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयांची पेन्शन दिली जाणार आहे. म्हणजे वार्षिक 36 हजार रुपये एवढी रक्कम या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या योजनेसाठी सीएससी सेंटरवर जाऊन शेतकऱ्यांना अर्ज करता येऊ शकतो किंवा पीएम किसान मानधन योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन देखील यासाठी अर्ज सादर करता येणार आहे.