Edible Oil Rate Hike : नुकताच गणेशोत्सवाचा मोठा सण साजरा करण्यात आला आहे. गणेशोत्सवानंतर आता महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाचा आनंददायी पर्व सुरू होणार आहे. यानंतर विजयादशमी आणि दसऱ्याचा तसेच दिवाळीचा मोठा सण येणार आहे. या सणासुदीच्या कालावधीत खाद्यतेलाची मागणी वाढते.
दरवर्षी सणासुदीला खाद्यतेलाच्या मागणीमध्ये वाढ होत असल्याने तेलाचे भाव आकाशाला गवसणी घालतात. यंदा तर शासनाने नुकताच खाद्यतेल आयाती वरील शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
कच्चे तेल आणि रिफाइंड तेलावरील आयात शुल्क वाढवण्याचा मोठा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला असून या निर्णयाचा संपूर्ण देशभरातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
केंद्राच्या या निर्णयामुळे तेलबिया पिकांचे भाव कडाडणार आहेत. मात्र हा निर्णय सर्वसामान्य ग्राहकांची डोकेदुखी वाढवणार आहे. कारण की, या निर्णयानंतर लगेचच खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत.
सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा, पाम तेल अशा सर्वच तेलांचे भाव गेल्या काही दिवसांमध्ये वधारले असून ऐन सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार असे दिसत आहे. दरम्यान, आता आपण खाद्यतेलाच्या किमती वाढल्यानंतर 15 किलोचा तेलाचा डबा कितीला उपलब्ध होतोय याविषयी माहिती पाहणार आहोत.
सोयाबीन, शेंगदाणा आणि सूर्यफूल तेलाचे ताजे भाव
15 किलोचा सूर्यफूल तेलाचा डबा आधी 1 हजार 720 रुपयांना होता, तो आता 1 हजार 980 रुपयांना झाला आहे. म्हणजे सूर्यफूल तेलाचे भाव 15 किलो मागे 260 रुपयांनी वाढले आहे. तसेच सोयाबीन तेलाचा डबा दीड हजारांवरून 1 हजार 800 रुपयांपर्यंत गेला आहे. अर्थातच सोयाबीन तेलाच्या भावात तीनशे रुपयांची वाढ झाली आहे.
कांदा, खोबरे सार काही महागल
फक्त खाद्यतेलच महाग झाले आहे असे नाही तर इतरही किराणा वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. यासोबतच कांद्याच्या किमतीही वाढल्या आहेत. विशेष म्हणजे कांद्याच्या किमती आगामी काळात किरकोळ बाजारात 100 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचतील असा अंदाज व्यापाऱ्यांच्या माध्यमातून वर्तवला जात आहे.
याशिवाय खोबऱ्याच्या किमती गेल्या काही दिवसांमध्ये पन्नास रुपयांपर्यंत वाढल्या असून सध्या खोबरे 180 रुपये प्रति किलो या दरात विकले जात आहे. आधी हरभरा 95 रुपयांना विकला जात होता मात्र आता हरभऱ्याचे दर 105 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत.
बेसनचे दर आधी 95 रुपये प्रति किलो असे होते मात्र आता हे दर 120 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलेत. साखरेचे भाव देखील किलोमागे दोन रुपयांनी वाढले असून सध्या 42 रुपये प्रति किलो या दराने साखर उपलब्ध होत आहे.