Donkey Farming In India : आपल्या देशात शेती सोबतच पशुपालन देखील मोठ्या प्रमाणात केले जात आहे. पशुपालनात प्रामुख्याने गाई-म्हशी आणि शेळ्यां-मेंढ्याचे संगोपन केले जाते. तर काही शेतकरी डुक्कर पालन अर्थातच वराह पालन देखील करतात.
मात्र आज आपण अशा शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी गाय, म्हैस, शेळी, मेंढी, वराह हे सोडून चक्क गाढव पालनातून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. खरंतर आपल्याकडे गाढवाला फक्त ओझं वाहून नेणारे प्राणी म्हणून ओळखले जाते.
पण गाढव हा एक मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे. याचे पालन पशुपालकांना लाखो रुपयांची कमाई करून देऊ शकते. कारण की बाजारात गाढवाच्या दुधाला मोठी मागणी आहे. आपल्याकडे गाई-म्हशींचे दूध जास्तीत जास्त 60 ते 70 रुपये प्रति लिटर या दरात उपलब्ध होते.
पण गाढवाचे दूध तब्बल 7 हजार रुपये प्रति लिटर या दरात बाजारात विकले जात असल्याचा दावा केला जात आहे. तसेच कॉस्मेटिक कंपन्यांमध्ये गाढवाच्या दुधाला मोठी मागणी असते. हेच कारण आहे की अलीकडे देशातील काही शेतकऱ्यांनी गाय, म्हैस, शेळी, मेंढी, वराह या ऐवजी गाढव पालनाला पसंती दाखवली आहे.
यातून त्यांना चांगली कमाई देखील होत आहे. महाराष्ट्र शेजारील गुजरात राज्यातूनही असेच एक उदाहरण समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील पाटण जिल्ह्याच्या मौजे मनुंद येथील एका रहिवाशाने गाढव पालनाचा व्यवसाय केला आहे. धीरेन सोलंकी असे या अवलियाचे नाव आहे. खरे तर धीरेन सरकारी नोकरीच्या शोधात होता.
नोकरीसाठी त्यांनी अनेक ठिकाणी भटकंती केली. सरकारी नोकरीसाठी ते दिवस-रात्र अभ्यास करत होते. मात्र नोकरी काही लागत नव्हती. शिवाय त्यांना काय करावे हे सुचत नव्हते. उदरनिर्वाहासाठी काहीतरी करणे भाग होते. मग काय त्यांनी गाढवपालन करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी दक्षिण भारतातून माहिती मिळाली.
दक्षिण भारतात काही लोक मोठ्या प्रमाणात गाढव पालन करतात. येथूनच मग त्यांनी गाढव पालनाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतले. त्यानंतर, मग त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. सोलंकी यांनी सांगितल्याप्रमाणे, सुमारे 8 महिन्यांपूर्वी त्यांनी या व्यवसायासाठी 22 लाख रुपये खर्चून जमीन खरेदी केली. यानंतर मग त्यांनी 20 गाढवांसह गाढव पालन सुरु केले आहे.
व्यवसाय सुरू झाला मात्र सुरुवातीचे पाच महिने त्यांना या व्यवसायातून एकही रुपया उत्पन्न मिळाले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे गुजरातमध्ये गाढवाच्या दुधाला मागणीच नाही. यामुळे आता करायचे काय हा मोठा सवाल त्यांच्या पुढ्यात होता. मग त्यांना दक्षिण भारतात गाढवाच्या दुधाला मोठी मागणी असल्याचे समजले.
यानंतर त्यांनी तेथील काही कंपन्यांचे संपर्क साधला आणि मग खऱ्या अर्थाने त्यांच्या व्यवसायाला चांगला बूस्टर मिळाला. यानंतर त्यांनी केरळ आणि कर्नाटक राज्यात देखील गाढवाचे दूध विक्रीस पाठवले. आज धीरेन यांच्याकडे 42 गाढव आहेत. त्यात आतापर्यंत त्यांनी अंदाजे 38 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
तसेच त्यांच्याकडे असलेले 1 गाढव 800 मिली दूध देत आहे. दरम्यान, या व्यवसायातून त्यांना दरमहा दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. निश्चितच गाय, म्हैस पालन सोडून गाढव पालनाचा केलेला हा प्रयोग सोलंकी यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून त्यांना आजच्या घडीला या व्यवसायातून लाखोंची कमाई होऊ लागली आहे.