Dhananjay Munde : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पिक विमा धारक शेतकऱ्यांना पिक विमा रकमेची 25% अग्रीम लवकरच वितरित होणार असे आश्वासन दिले आहे.
काल अर्थातच 2 ऑक्टोबर रोजी कृषिमंत्री धनंजय मुंडे नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 23 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील बहुतांशी भागांमधील शेती पिके वाया गेली आहेत. या बाधित शेती पिकांची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर हजेरी लावली.
यावेळी कृषिमंत्री मुंडे यांनी एक रुपयात पिक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी 25% अग्रीम रक्कम मिळणार असल्याचे सांगितले आहे. नागपूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात किडीचा व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
याशिवाय जिल्ह्यातील शेती पिके अतिवृष्टी आणि बोगस कीटकनाशकांच्या फवारणीमुळे बाधित झाली असून यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कृषिमंत्री मुंडे यांनी नागपूर जिल्ह्याचा दौरा केला आहे.
यावेळी कृषीमंत्र्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बांधावरच आश्वस्त केले आहे. धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे, यावर्षी राज्यात १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. विशेष म्हणजे यंदा एक रुपयात पिक विमा योजना राबवण्यात आली असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी आंतरपिकाचा सुद्धा विमा काढला असल्याची माहिती मुंडे यांनी यावेळी दिली आहे.
तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या सर्वांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईच्या देय रकमेची २५ टक्के रक्कम दिवाळीपूर्वी दिली जाईल असे आश्वासन देखील कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले आहे. यामुळे जर शासनाने दिवाळीपूर्वी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली तर शेतकऱ्यांना सणासुदीच्या दिवसात मोठी मदत मिळणार असल्याचा आशीर्वाद व्यक्त होत आहे.
याशिवाय, ६५ मिलीमीटर पेक्षा जास्त आणि सतत चार तास पाऊस ज्या ठिकाणी झाला आहे, अशा अतिवृष्टी बाधित पिकांसाठी राज्य आपदा मदत निधी ( एसडीआरएफ ) व केंद्रीय आपदा मदत निधीच्या ( एनडीआरएफ ) नियमानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाईल आणि ही मदत देखील आम्ही लवकरच देणार आहोत अशी माहिती देखील त्यांनी काल नागपूर दौऱ्यावर असताना दिली आहे.
राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा विषय लवकरच मांडणार असून यावर तत्काळ निर्णय घेतला जाईल असे मुंडे यांनी सांगितले असून नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल राज्य शासनाने मागवला असल्याची महत्त्वाची माहिती देखील कृषिमंत्री महोदय यांनी यावेळी दिली आहे.
यामुळे आता मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे पिक विम्याची 25% अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.