Delhi Mumbai Expressway : भारत वर्षात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्गांची कामे जोमात सुरू आहेत. यामध्ये दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे चा देखील समावेश आहे. हा एक्सप्रेस वे एकूण सहा राज्यातून जाणार असून महाराष्ट्रासाठी विशेष खास राहणार आहे.
कारण की या मार्गामुळे राज्याची राजधानी मुंबईहून देशाची राजधानी दिल्ली अवघ्या बारा तासात गाठता येणार आहे. दरम्यान आता या महामार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आलं आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या दिल्ली-मुंबई महामार्गाचा पहिला टप्पा दिल्ली ते दौसा जानेवारीमध्ये सुरु होऊ शकतो.
म्हणजेच नववर्षाच्या सुरुवातीलाच या महामार्गाचा पहिला टप्पा कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. दरम्यान या महामार्गावर प्रवास करणारे प्रवासी 220 किलोमीटरचे अंतर दोन तासात पार करू शकतील.
खरं पाहता, पहिला टप्पा सुरू करण्याच्या अनेक मुदती चुकल्या आहेत. मात्र आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दौसापर्यंतच्या कॉरिडॉरचे ९९.९ टक्के काम पूर्ण झाले आहे. फिनिशिंगचे काम देखील सुरू आहे.
अशा परिस्थितीत आता पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी ग्रीन सिग्नल मिळताच हा महामार्ग सुरू करण्यात येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या महामार्गाचा पहिला टप्पा जानेवारी महिन्यात सुरू होणार असून दिल्ली ते मुंबई हा संपूर्ण कॉरिडॉर डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज असल्याचे जाणकार लोकांनी स्पष्ट केले आहे.
या महामार्गाचा दिल्ली ते दौसा या रस्त्यांचे काम पाहणारे प्रकल्प संचालक मुदित गर्ग यांनी सांगितल्याप्रमाणे, जोपर्यंत या कॉरिडॉरवर कायमस्वरूपी पेट्रोल पंप किंवा इतर सेवा सुरू होत नाहीत, तोपर्यंत लोकांना मोबाईल पेट्रोल पंपांद्वारे पेट्रोल आणि डिझेल पुरवले जाणार आहे. यानंतर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू होतील आणि त्यानंतर सीएनजी पंपही बसवले जातील.
करारानुसार, कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर आठ महिन्यांनी सर्व सुविधा कार्यान्वित करायच्या होत्या, परंतु त्या आधी सुरू केल्या जातील. कॉरिडॉरवरील रेस्टॉरंट, प्रसाधनगृहे, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स आदी सुविधा पूर्ण करण्याचे काम देखील सोबतचं सुरू आहे.
विमानाचे आपत्कालीन लँडिंगची पण सुविधा
दिल्ली-मुंबई महामार्ग दोन राजधान्या जोडणारा महामार्ग अतिशय हायटेक असा बनवण्यात येणार आहे. या कॉरिडॉरची रचना अशी आहे की, विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले तर त्यावर विमान उतरवता येणे शक्य होणार आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) अशी मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत, परंतु गरज पडल्यास काही भाग असे आहेत की जेथे उच्च तणावाच्या तारा नाहीत, जेथे विमानाचे आपत्कालीन लँडिंग केले जाऊ शकते.
तसेच या महामार्गाची अजून एक मोठी विशेषता म्हणजे महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक स्वतंत्र लेन तयार करण्यात येणार आहे. अर्थातच इलेक्ट्रिक वाहने एका स्पेसिअल लेनने चालणार आहेत. हा महामार्ग पर्यावरणासाठी मोठा अनुकूल सिद्ध होणार आहे.
सांगितलं जातं की हा मार्ग सुरू झाला की दरवर्षी सुमारे 32 कोटी लिटर इंधनाची बचत होणार आहे. यामुळे कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन दरवर्षी सुमारे 85 कोटी किलोमीटरने कमी होईल, जे 4 कोटी झाडे लावण्याइतके आहे. साहजिकच यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होणार आहे. तसेच वाढती वृक्षतोड लक्षात घेता या महामार्गावर सुमारे 20 लाख रोपे लावण्यात येणार आहेत.
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग 1380 किमी लांबीचा आहे. या महामार्गामुळे राजधानी मुंबईहून राजधानी दिल्ली प्रवास करणे सोयीचे होणार आहे. या महामार्गाच्या उभारणीसाठी जवळपास एक लाख कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. या महामार्गावर ताशी १२० किमी वेगाने वाहने धावणार असून दिल्लीहून मुंबईला १२ तासांत पोहोचणे शक्य होणार आहे.
यामुळे जनाब अब दिल्ली दूर नहीं. तसेच हा कॉरिडॉर 12 लेनचा करण्याची योजना आखण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 12 लेन रस्ता करण्यासाठी यामध्ये आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. सध्या हा महामार्ग 8 लेनचा असून भविष्यात गरजेनुसार याला एक्सपांड करता येणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या महामार्गाच्या मधोमध 21 मीटर रुंद जागा सोडण्यात येत असून, या महामार्गावरील वाहतूक वाढताच दोन्ही बाजूला आणखी दोन लेन जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे हा महामार्ग १२ लेनचा होणार आहे.