Cyclone Rain Alert : सध्या देशातील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. काही भागात पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. अशातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
विशेष म्हणजे काल हे कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात परावर्तित झाले आहे. या चक्रीवादळाला मिधिली असे नाव देण्यात आले आहे. यामुळे देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तसेच हे चक्रीवादळ आज अर्थातच 18 नोव्हेंबरला बांगलादेशच्या किनारपट्टी पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळ “मिधिली” हे त्रिपुरा आणि लगतच्या बांग्लादेशावरील मजदीकोर्ट (बांगलादेश) च्या उत्तर-ईशान्येस सुमारे 50 किमी आणि आगरतळापासून 60 किमी दक्षिण-पूर्वेस असलेल्या खोल दाबामध्ये कमकुवत झाले असल्याची माहिती हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
तथापि या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे भारताच्या इशान्यकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. मेघालय, मिजोरम, त्रिपुरा, आसाम या राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या हवामान बदलामुळे ईशान्येकडील राज्ये मिझोराम आणि त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, दक्षिण आसाम आणि पूर्व मेघालय येथे आज शनिवारपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे त्रिपुरा राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट केला आहे. आयएमडीने आज 18 नोव्हेंबरला त्रिपुरा येथील ऐझॉल जिल्ह्यात 51 मिमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
चांफई, कोलासिब, लॉन्गटलाई आणि ममित जिल्ह्यांमध्ये देखील 50 ते 55 मिमी एवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे या संबंधीत जिल्ह्यातील नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आहे.
पण या चक्रीवादळामुळे आपल्या महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही. आगामी पाच दिवस राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. खर तर या चक्रीवादळापूर्वी बंगालच्या उपसागरात हामून नावाचे चक्रीवादळ तयार झाले होते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी हे हामून चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण झाले होते.