CSMT Sainagar Shirdi Vande Bharat Express : 2019 पासून देशात वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन सुरू करण्यात आली आहे. ही ट्रेन आपल्या गतिमान आणि सुरक्षित प्रवासासाठी ओळखली जाते. या ट्रेनमध्ये प्रवाशांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या ट्रेनचा प्रवास रेल्वे प्रवाशांना मोठा मनमोहक वाटत आहे.
हेच कारण आहे की देशातील जवळपास सर्वच वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांनी पसंती दाखवली आहे. आतापर्यंत देशातील 25 मार्गावर ही गाडी चालू झाली आहे. यात आपल्या महाराष्ट्रातून पाच महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी धावत आहे. राज्यातील मुंबई-गांधीनगर, मुंबई-साईनगर शिर्डी, मुंबई-सोलापूर, मुंबई-गोवा आणि नागपूर-बिलासपूर या महत्त्वाच्या मार्गावरी ही गाडी सुरू आहे.
खरंतर वंदे भारत एक्सप्रेस ही राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेस पेक्षा भारी गाडी असल्याचा दावा रेल्वेने केला आहे. ही गाडी खूपच चकचकीत आणि पॉश आहे. अशा परिस्थितीत या गाडीमध्ये जेवणाचा दर्जा देखील उत्कृष्ट असणे आवश्यक आहे. प्रवाशांना देखील अशीच अपेक्षा आहे. पण प्रत्यक्षात वंदे भारत एक्सप्रेस मध्ये मिळणारे जेवण हे खूपच बोगस असल्याच्या तक्रारी प्रवाशांच्या माध्यमातून केल्या जात आहेत.
या गाडीमध्ये चांगल्या दर्जाचे जेवण मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. अशातच साईनगर शिर्डी-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस मध्ये एका प्रवाशाला चक्क शिळा नाचणीचा लाडू देण्यात आला असल्याचे उघडकीस आले आहे. एवढेच नाही तर लाडूचा बॉक्स देखील फाटलेला होता. यामुळे सदर प्रवाशाने ट्विटरवर याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. संदीप नामक एका प्रवाशासोबत ही घटना घडली आहे.
संदीपने याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. संदीपने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी शिर्डी ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांना जेवण देण्यात आले होते. मात्र जेवणासोबत देण्यात आलेल्या गोड पदार्थांमध्ये मिळालेले नाचणीचे लाडू शिळे निघालेत. तसेच त्या लाडूचा बॉक्स देखील फाटलेला होता. यामुळे संदीपने या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.
याबाबत आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, प्रवाशांचे जेवण बनवण्यासाठी तीन ते चार तास लागतात. मोठ्या प्रमाणात प्रवाशांसाठी जेवण तयार करावे लागते. यामुळे कदाचित चुकून एखादी घटना घडली असेल असे त्यांनी सांगितले आहे. तसेच आय आर सी टी सी च्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या प्रकरणाबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
वास्तविक वंदे भारत एक्सप्रेस मध्ये घडलेला हा पहिलाच प्रकार नाही. याआधी देखील प्रवाशांनी जेवणाबाबत तक्रारी केल्या आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करताना एका प्रवाशाच्या जेवणात चक्क झुरळ आढळले होते. यामुळे जरी ही गाडी गतिमान, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी विशेष लोकप्रिय बनत असली तरी देखील यामध्ये मिळणारे जेवण हे चांगले नाही हे यावरून स्पष्ट होत आहे. यामुळे या गाडीत दिले जाणारे जेवण हे चांगले असणे आवश्यक आहे.