Cow Farming : भारतासह संपूर्ण जगात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. हा व्यवसाय शेतीशी निगडित असल्याने शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात दुधाचा व्यवसाय करतात. दुधाच्या व्यवसायासाठी प्रामुख्याने गाईंचे तसेच म्हशीचे संगोपन केले जाते. पण, दुधाचा व्यवसाय गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या संकटात सापडला आहे.
याचे कारण म्हणजे दुधाला बाजारात खूपच कमी भाव मिळतोय. शिवाय पशुखाद्याचे, इंधनाचे, मजुरीचे वाढलेले दर दुधाच्या व्यवसायातील उत्पादन खर्च वाढवत आहेत. अशा परिस्थितीत, दुधाचा व्यवसाय हा रिस्की बनला असून अनेकांच्या माध्यमातून हा व्यवसाय आता परवडत नसल्याची तक्रार होऊ लागली आहे.
मात्र जर अधिक दूध उत्पादन देणाऱ्या गाय किंवा म्हशीच्या जातीचे संगोपन केले तर दूध व्यवसायातून चांगली कमाई होऊ शकते. यामुळे जाणकार लोक शेतकऱ्यांना अधिक दूध उत्पादन देणाऱ्या गाईचे आणि म्हशीचे पालन करण्याचा सल्ला देत असतात. यामुळे आज आपण गायीच्या अशा 5 जाती जाणून घेणार आहोत ज्यातून शेतकऱ्यांना चांगले दूध उत्पादन मिळू शकणार आहेत.
लाल सिंधी : ही गाय सिंध प्रदेशात आढळत असल्याने आणि या गायीचा रंग प्रामुख्याने लाल असल्याने या जातीला लाल सिंधी हे नाव पडले आहे. ही गाय मध्यम उंचीची असते. डोके रुंद व शिंगे जाड असतात. याची शेपटी लांब आणि पाय लहान असतात. गायीची त्वचा सैल असते. या जातीमध्ये सर्व प्रकारचे हवामान सहन करण्याची क्षमता असते.
अर्थातच कोणत्याही हवामानात या जातीचे पालन केले जाऊ शकते. ही गाय दिवसाकाठी 15 ते 20 लिटर दूध देते. जर योग्य काळजी घेतली तर दूध उत्पादन अजून वाढू शकते. या गायीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर ही गाय बाजारात 15 ते 80 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध होते.
गीर गाय : या गायीचं मूळ स्थान गुजरात मधील दक्षिण काठीयावाड या भागातील गिर जंगल असल्याचा दावा केला जातो. यामुळे या गाईला गिर गाय म्हणून ओळखले जाते. ही भारतातील सर्वात जास्त दूध देणारी गाय म्हणून ओळखले जाते. ही गाय संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.
ही गाय दररोज 12 ते 20 लिटरपर्यंत दूध देते. योग्य काळजी घेतली तर या जातीची गाय 40 ते 50 लिटर पर्यंत देखील दूध देऊ शकते असा दावा तज्ञांनी केला आहे. गिर गाय बाजारात 50 ते 60 हजार रुपये किमतीत उपलब्ध होते. तथापि किमतीत गायीच्या दूध उत्पादनाच्या क्षमतेनुसार बदल होऊ शकतो.
साहिवाल गाय : भारतीय पशुपालकांमध्ये या जातीची गाय विशेष प्रसिद्ध आहे. अनेक जण या जातीच्या गायीचे संगोपन करत आहेत. शेतकऱ्यांना या जातीच्या गौपालनातून चांगली कमाई देखील होत आहे. दूध उत्पादनाबाबत बोलायचं झालं तर या जातीची गाय दिवसाला 10 ते 15 लिटर पर्यंतचे दूध देऊ शकते. योग्य काळजी घेतली तर वीस ते तीस लिटर पर्यंत दूध सहजतेने देते असा दावा तज्ञांनी केला आहे.
कांकरेज गाय : ही देखील गायीची एक सुधारित जात आहे. या जातीच्या गायपालनातून देखील शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. ही गाय दिवसासाठी आठ ते दहा लिटर पर्यंतचे दूध देते. या जातीची गाय कोणत्याही हवामानात तग धरत असल्याचा दावा केला जातो. एका वेतात ही गाय 1,800 लिटर पर्यंतचे दूध देऊ शकते मात्र यासाठी योग्य काळजी घ्यावी लागणार आहे. या जातीच्या गायीची किंमत देखील 80 हजाराच्या आसपास असते.
थारपारकर : भारतात या जातीचे देखील मोठ्या प्रमाणात संगोपन केले जात आहे. या जातीच्या गायी दूध उत्पादनासाठी विशेष ओळखल्या जात आहेत. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, या जातीची गाय दिवसाकाठी बारा ते पंधरा लिटरपर्यंत दूध देण्यास सक्षम आहे. एका वेतात ही गाय 1600 ते 2500 लिटर एवढे दूध देऊ शकते असा दावा काही तज्ञांनी केला आहे. बाजारांमध्ये या जातीची गाय 40 ते 50 हजार रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे.