Cow Farming : भारतात गेल्या कित्येक वर्षांपासून शेतीसोबतच पशुपालनाचा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पशुपालन व्यवसाय हा मुख्यत्वे दूध उत्पादनासाठी केला जातो. अलीकडे दुधाचा धंदा मात्र शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे वास्तव आहे. याचे कारण म्हणजे जनावरांची दूध उत्पादनक्षमता कमी होत चालली आहे.
पशुखाद्याच्या किमती, इंधनाच्या किमती, मजुरीचे दर वाढत आहेत. दुसरीकडे दुधाला अपेक्षित भावही मिळत नाहीये. त्यामुळे दूध उत्पादनाचा खर्च वाढत आहे आणि या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न कमी होऊ लागले आहे.
परिणामी, आता अनेकांनी दुधाचा व्यवसाय बंद केला आहे. मात्र जर गाईच्या आणि म्हशीच्या सुधारित जातींचे पालन केले गेले तर शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे. दरम्यान आज आपण गायीच्या अशाच एका सुधारित जातीची माहिती जाणून घेणार आहोत.
आज आपण ज्या जातीची माहिती पाहणार आहोत ती गाईची जात एका वेतात तब्बल 3500 लिटर पर्यंतचे दूध देते. त्यामुळे निश्चितच दूध उत्पादन शेतकऱ्यांना गाय पालनातून चांगली कमाई होणार आहे.
कोणती आहे ती जात ?
गाय पालनाचा व्यवसाय जर फायदेशीर बनवायचा असेल तर गाईच्या सुधारित जातींचे संगोपन करणे आवश्यक आहे. भारतात गाईच्या विविध जाती आढळतात. फुले त्रिवेणी हे देखील गाईची एक सुधारित जात आहे.
गायीच्या तीन जातींचे संकर करून ही नवीन जात विकसित करण्यात आली आहे. गायीची ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. होलस्टेन फ्रीजियन, जर्सी आणि गीर जातींपासून ही फुले त्रिवेणी जात विकसित करण्यात आली आहे.
गाईच्या तीन जातींपासून ही जात तयार झाली असल्याने या जातीला फुले त्रिवेणी असे नाव देण्यात आले आहे. या गाईची रोगप्रतिकारक क्षमता खूपच चांगली असून एका वेतात 3,500 लिटर एवढे दूध देण्याची क्षमता असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
महाराष्ट्रातील हवामानात तग धरून राहील अशी गाईची जात विकसित करण्याच्या हेतूने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाने गाईची ही सुधारित जात विकसित केली आहे. त्यामुळे राज्यातील पशुपालकांना मोठा फायदा होत असून या जातीचे राज्यातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात संगोपन केले जात आहे.