Cow And Buffalo Farming : जर तुम्हीही शेती सोबतच पशुपालनाचा व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा ठरणार आहे. आपल्याकडे फार पूर्वीपासूनच शेती सोबतच पशुपालनाचा व्यवसाय केला जातो. यासाठी गायी, म्हशींचे मोठ्या प्रमाणात संगोपन केले जाते. पशुपालनाचा व्यवसाय हा प्रामुख्याने दुग्ध उत्पादनासाठी होत असतो. यामुळे गाई म्हशींच्या चांगल्या दूध देणाऱ्या जातींचे संगोपन करण्याचा सल्ला दिला जातो.
सोबतच दूध उत्पादन वाढवण्यासाठी गाय किंवा म्हैस गाभण असताना त्यांची योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला जात असतो. दरम्यान, आज आपण दुधाळ जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या गाभण काळात कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
गाभण काळात हे औषध दिल्यास दूध उत्पादन वाढणार
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गाभण म्हैस ३१० दिवसात तर गाय २७० दिवसात पिल्लांना जन्म देत असते. पण, जनावरांनी चांगले दूध द्यावे यासाठी गाभण काळापासूनचं योग्य व्यवस्थापन करावे लागते. यां काळात जनावरांना अतिरिक्त पूरक आहार देण्याची गरज असते जेणेकरून ते निरोगी पिल्लाला जन्म देईल आणि चांगले दूध उत्पादन मिळेल.
गाय, म्हैस गाभण झाल्यानंतर सुरुवातीचे ३ महिने नियमित चारा देणे सुरू ठेवा आणि सोबतच खनिज मिश्रणाचे प्रमाण वाढवा. नंतर जेव्हा तीन महिने पूर्ण होतील तेव्हापासून सहा महिने होईपर्यंत गाभण जनावरांना प्रथिनयुक्त आहार द्या आणि त्यासोबत खनिज मिश्रण देत राहा.
मात्र जेव्हा जनावरांचा गाभण काळ सहा महिन्यांचा होतो त्यानंतर पशुपालकांनी जनावरांची विशेष काळजी घेतली पाहिजे. सातव्या महिन्यानंतर गाभण जनावरांकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे, जर जनावर दूध देत असेल तर त्याहूनही अधिक काळजी घेणे आवश्यक राहणार आहे.
जर सातव्या महिन्यानंतरही गाभण गाय किंवा म्हैस दूध देत असेल तर अशावेळी गाभण जनावराचे दूध काढणे बंद करा. तज्ञ सांगतात की जनावरांचा गाभण काळ 6 महिन्यांचा झाल्यानंतरही जर तुम्ही जनावराचे दूध काढले तर पुढील वेतात तुम्हाला चांगले दूध उत्पादन मिळणार नाही.
यामुळे जनावरांचा गाभण काळ 6 महिन्यांचा झाल्यानंतर म्हणजे सातव्या महिन्यापासून त्या गाभण जनावराचे दूध काढणे बंद करा. तसेच जेव्हा जनावरांचे गर्भधारणेचे दिवस पूर्ण होत आले की, त्यांचा गोठा स्वच्छ आणि हवेशीर ठेवावा.
शेवटच्या टप्प्यात गाभण जनावराला बांधल्यावर त्याचा मागचा भाग वर करावा व पुढचा भाग खाली ठेवावा जेणेकरुन पोटातील पिल्लाचे वजन पाठीमागे येणार नाही. याशिवाय गाभण काळ पूर्ण होत आला की जनावराला जास्त फिरवू नये. या काळात जनावरांना 20 ते 25 किलो हिरवा चारा आणि 4 ते 5 किलो सुका चारा द्यावा.
शेवटच्या टप्प्यात जनावरांना कॅल्शियम आणि खनिज मिश्रण सतत देत रहा. गाभण जनावरांना मिल्क फिवर हा आजार होण्याची शक्यता असते. यामुळे गाय, म्हैस व्याल्याच्या काही दिवस आधी म्हणजे जवळपास एक महिना आधी त्यांना मेटाबोलाइटचे एक-एक पाऊच दररोज दिले गेले पाहिजे.
या पाऊचची किंमत ही फक्त वीस रुपये आहे. तुम्हाला हे औषध कोणत्याही पशुवैद्यकीय मेडिकल स्टोअरवर मिळून जाईल. तथापि जनावरांना कोणतेही औषध देण्या अगोदर तुम्ही तुमच्या पशु डॉक्टरांचा एकदा अवश्य सल्ला घेतला पाहिजे.