Cotton Variety For Maharashtra : गेल्या दहा-अकरा दिवसांपासून शेतकऱ्यांना कापसाचे बियाणे उपलब्ध होत आहे. दरम्यान सध्या राज्यातील शेतकऱ्यांची कृषी निविष्ठांचा दुकानावर बी-बियाण्यांची खरेदी आणि खतांच्या खरेदीसाठी मोठी धावपळ पाहायला मिळत आहे. कृषी निविष्ठांच्या दुकानावर कपाशीच्या बियाण्याची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लांबच लांब रांग लागत आहे.
तथापि शेतकऱ्यांना कापसाचे बियाणे उपलब्ध होत असले तरीही त्यांनी कपाशीची पेरणी जून महिन्यातच करावी असे आवाहन कृषी विभागातील तज्ञांनी केले आहे. जर कपाशीची लवकर लागवड केली तर त्यावर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव अधिक होतो.
गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. यामुळे कपाशीची पुढील महिन्यात म्हणजेच जून महिन्यातच लागवड करा असे आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. शेतकरी बांधव देखील जून महिन्यातच कपाशीची मोठ्या प्रमाणात पेरणी करणार असे चित्र आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण कपाशीच्या दोन सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हलक्या ते मध्यम जमिनीत लागवडीसाठी उपयुक्त आणि चांगल्या उत्पादनक्षम कपाशीच्या वाणाची आज आपण माहिती पाहणार आहोत.
कपाशीचे सुधारित वाण
कावेरी सीड्स कंपनीचे जादू : कावेरी सीड्स कंपनीचे अनेक कपाशी वाण तुम्हाला बाजारात पाहायला मिळतील. यातील जादू हे एक सुधारित वाण आहे. याची लागवड राज्यातील बहुतांशी भागांमध्ये केली जाते. 2024 च्या खरीप हंगामात देखील याची मोठ्या प्रमाणात पेरणी होणार असा अंदाज आहे.
कृषी तज्ञांनी हलक्या ते मध्यम जमिनीत या जातीची लागवड करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. या जातीची कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये लागवड करता येते. लागवडीनंतर 160 ते 170 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते.
जर तुम्हाला सघन पद्धतीने म्हणजेच कापसाची दाट लागवड करायची असेल तर हा वाण तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. ही जात रस शोषक किडींसाठी प्रतिकारक आहे. या जातीचा कापूस वेचणीला खूप सोपा आहे. चार बाय दीड फूट या अंतरावर याची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते.
अजित सीड्स कंपनीचे अजित 155 : हे देखील वाण हलक्या ते मध्यम जमिनीत लागवडीसाठी उपयुक्त आहे. जिरायती आणि बागायती भागांमध्ये याची लागवड होऊ शकते. लागवडीनंतर सरासरी 145 ते 158 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते.
रस शोषक किडीस आणि लाल्या रोगास या जातीचे पीक प्रतिकारक असल्याचे आढळले आहे. या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळत आहे. महाराष्ट्रातील हवामान या जातीसाठी विशेष अनुकूल आहे.