Cotton Variety : येत्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. जून महिन्यात कापसाची पेरणी सुरू होणार आहे. खरे तर शेतकऱ्यांना 16 मे पासून कापूस बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकरी बांधव बी बियाण्यांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
तथापि अनेकांच्या माध्यमातून यंदा कोणत्या जातीच्या कापसाची लागवड करावी असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान आज आपण हलक्या ते मध्यम जमिनीत लागवडीसाठी उपयुक्त कापसाच्या अशाच दोन जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
हलक्या ते मध्यम जमिनीत लागवडीसाठी उपयुक्त कापसाच्या जाती
जादू : कावेरी सीड्स कंपनीचे जादू हे वाण राज्यातील शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या जातीची राज्यातील प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. हलक्या ते मध्यम जमिनीत लागवडीसाठी या जातीची शिफारस केली जाते.
कोरडवाहू किंवा बागायती अशा दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये या जातीची लागवड केली जाऊ शकते. सरासरी 155 ते 170 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होत असते. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जात रस शोषक किडीस प्रतिकारक आहे. ही जात दाट लागवडीसाठी चांगली आहे.
खरंतर गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सघन लागवडीला म्हणजे दाट कापूस लागवडीला पसंती दाखवली जात आहे. यामुळे जर तुम्हीही दाट कापूस लागवड करण्याच्या तयारीत असाल तर हा वाण तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
4 ×1.5 फूट अंतरावर या जातीची लागवड केली तर चांगले उत्पादन मिळू शकते. एका बोंडातील कापसाचे सरासरी वजन 6 ते 6.5 ग्राम भरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या जातीचा कापूस वेचणीला खूपच सोपा असतो.
अजित 155 : अजित सीड्स कंपनीचा हा देखील वाण शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. या जातीची हलक्या ते मध्यम जमिनीत लागवड केली जाऊ शकते. कोरडवाहू म्हणजेच जिरायती आणि बागायती अशा दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये या जातीची लागवड करता येणे शक्य असेल.
या जातीचा पीक परिपक व कालावधी हा एक 145 ते 160 दिवसांचा आहे. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या जातीचे पीक रस शोषक किडीस व लाल्या रोगास प्रतिकारक असल्याचे दिसून आले आहे. ही जात पाण्याचा ताण सहन करू शकते.