Cotton Rate : शेतकऱ्यांसाठी कापूस बाजारातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कापसाच्या भावात मोठी वाढ होणार असा अंदाज आहे. विशेष म्हणजे कापसाच्या बाजारात गेल्या आठवड्यापासून दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सध्या कापूस शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.
वास्तविक, राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस आता विकून टाकला आहे. काही बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांकडे सध्या कापूस शिल्लक असेल. पण ज्या शेतकऱ्यांकडे माल असेल त्यांना या भाववाढीचा फायदा होईल असे मत जाणकारांनी व्यक्त केला आहे. बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत वाढणाऱ्या उष्णतेमुळे कापूस उत्पादक पट्ट्यात कपाशी पिकावर विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे.
अशातच चीनमध्ये कापसाची मागणी वाढली आहे. सध्या चीन स्टॉक मध्ये असलेला कापूस विक्री करत असल्याचे सांगितले जात आहे. याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारभावात वाढ होत असल्याचे चित्र आहे. याशिवाय देशांतर्गत देखील कापसाची मागणी वधारली आहे. कपड्यांना वाढत असलेली मागणी यामुळे सुताची मागणी वाढली असून सुताची मागणी वाढली असल्याने कापसाच्या मागणीत ही वाढ झाली आहे.
हेच कारण आहे की काल कापसाच्या देशांतर्गत वायद्यात देखील मोठी सुधारणा पाहायला मिळाली. याव्यतिरिक्त काल झालेल्या लिलावात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील कापसाचे भाव वधारले आहेत. सध्या कापसाला देशातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6700 ते 7300 दरम्यान भाव मिळत आहे.
राज्यातील बाजारात देखील हीच भाव पातळी कायम आहे. विशेष असे की देशातील काही मोजक्या बाजारात कापसाला 7500 पर्यंतचा कमाल भाव मिळू लागला आहे. खरंतर ऑगस्ट महिना हा कापूस बाजाराचा ऑफ सीजन असतो. या काळात बाजारात कापसाची चार हजार गाठीच्या दरम्यान आवक होते. यंदा मात्र ऑगस्टमध्ये देखील कापसाची 18,000 गाठीपर्यंतची आवक होत आहे.
असे असतानाही मागणीचा जोर पाहता गेल्या आठवड्याभरापासून कापसाच्या बाजारात सुधारणा होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशांतर्गत बाजारात वाढलेली मागणी पाहता बाजार भावात सुधारणा होत असल्याचे सांगितले जात असून या चालू ऑगस्ट महिन्यामध्ये बाजारभावात आणखी पाचशे रुपयांपर्यंतची वाढ पाहायला मिळू शकते, असा अंदाज बाजार अभ्यासकांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.