Cotton Rate : कपाशी हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. याची लागवड राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात मोठ्या प्रमाणात होते. खानदेशातील जळगाव जिल्हा हा कापूस उत्पादनासाठी संपूर्ण देशात ओळखला जातो. गेल्या दोन वर्षांपासून मात्र कापसाचे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत नाहीये.
शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नसल्याची वास्तविकता आहे. गत दोन्ही वर्षांच्या खरीप हंगामात उत्पादित झालेल्या कापसाला बाजारात खूपच कवडीमोल दर मिळाला आहे.
गेल्या वर्षीच्या कापसाला तर अनेक ठिकाणी हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी राजा भरडला जात असून यंदाच्या हंगामात म्हणजेच 2024 च्या खरीप हंगामात उत्पादित झालेल्या कापसाला कसा दर मिळणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
अशातच एक मोठी माहिती समोर येत आहे. यंदाही कापसाचे बाजार भाव दबावतच राहणार असे चित्र आतापासूनचं दिसू लागले आहे. खरेतर कापसाच्या किमती या आंतरराष्ट्रीय किमतींवर अवलंबून असतात.
सोयाबीनच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. दरम्यान या महिन्यात अमेरिकी शेती खात्याने (यूएसडीए) कापूस उत्पादनाचा एक सुधारित अहवाल जारी केला आहे.
सदर अहवालात या वर्षीच्या (ऑगस्ट २०२४ – जुलै २०२५) अमेरिकेतील कापूस उत्पादनाचे अंदाज जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये यंदा कापसाचे जागतिक उत्पादन ३.५ टक्क्यांनी वाढणार असे सांगितले गेले आहे.
या अहवालानुसार २०१९-२० नंतर यंदा सर्वोच्च उत्पादन मिळणार असा अंदाज आहे. ब्राझील आणि अमेरिकेत कापसाचे उत्पादन वाढणार असल्याने जागतिक कापूस उत्पादन वाढेल असे बोलले जात आहे.
यामुळे कापसाच्या बाजारभावावर परिणाम होणार आहे. जागतिक कापूस उत्पादनाचा हा अहवाल समोर आल्यानंतर यंदा देखील कापसाच्या किमती दबावात राहतील असे म्हटले जात आहे.
कापसाच्या जागतिक किमती लागोपाठ तिसऱ्या वर्षी घसरतील असे या अहवालात म्हटले गेले आहे. पण, या अहवालात आपल्या भारतातील उत्पादन यंदा ६.५ टक्क्यांनी कमी राहणार असा अंदाज वर्तवला गेला आहे.
म्हणजेच यंदा भारतात कापसाचे कमी उत्पादन असतानाही शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळणार नसल्याचे या अहवालावरून अधोरेखित होत आहे. तथापि भारतातील कापूस प्रत्यक्षात बाजारात दाखल झाल्यानंतर त्याला काय भाव मिळतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.