Cotton Rate : या चालू वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल मे 2024 मध्ये होतील असा अंदाज आहे. दरम्यान लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या देखील निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
अशा परिस्थितीत निवडणुकीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून भारत ब्रँड अंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून स्वस्तात तांदूळ, डाळ आणि पीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
याशिवाय खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात रहावे यासाठी खाद्यतेल आयातीसाठी पूरक धोरण केंद्र शासनाने अंगीकारले आहे. याचा परिणाम म्हणून सोयाबीनसह कापसाचे बाजार भाव दबावात आले आहे.
कापसाच्या सरकीला खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात असल्याने उठाव मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार 2021-22 मध्ये सरकीला तब्बल 4000 रुपये प्रतिक्विंटल एवढा भाव मिळत होता.
त्यामुळे त्यावेळी कापसाचे बाजार भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले होते. काही बाजारांमध्ये दहा हजारापेक्षा अधिक दर मिळत होता.
आता मात्र सरकीचे बाजार भाव 2700 ते 2800 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान स्थिरावलेले आहेत. याशिवाय वस्त्रोद्योग इंडस्ट्रिमध्ये आता कृत्रिम धाग्याचा वापर वाढू लागला आहे.
यामुळे कापसाच्या दरात खूपच घसरण झालेली आहे. केंद्र शासनाने 7020 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव कापसासाठी जाहीर केला आहे.
मात्र सध्या स्थितीला या हमीभावापेक्षाही कमी दर कापसाला मिळत आहे. सध्या बाजारात कापसाला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल ते सात हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे.
विशेष म्हणजे आगामी काळातही असेच बाजार भाव कायम राहतील अशी भीती आता तज्ञांच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची भाववाढीची आशा यंदा फोल ठरणार की काय असे बोलले जात आहे.