Cotton Rate : सध्या महाराष्ट्रात सर्वत्र सुगीचे दिवस सुरू असल्याने शेतकरी राजाची मोठी धावपळ पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधव आपल्या परिवारासहित आणि सालगड्यासहित शेतीमध्ये राबतोय. खरीप हंगामातील पिकांची काढणी केली जात आहे. कापसाची वेचणी सुद्धा सुरू झाली आहे. मात्र बाजारात या हंगामात उत्पादित झालेल्या कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्याचे वास्तव आहे.
खरे तर गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील अनेक कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि यामुळे साहजिकच उत्पादनात मोठी घट येणार आहे आणि कापसाचा दर्जा देखील घसरणार आहे.
सोबतच सध्या सुरू असणाऱ्या पावसामुळे कापसाची वेचणी देखील खोळंबत आहे. दुसरीकडे सुरुवातीच्या कापसाला बाजारात फारसा भाव मिळत नाहीये.
यंदा केंद्रातील सरकारच्या माध्यमातून लांब धाग्याच्या कापसाला 7521 आणि मध्यम धाग्याच्या कापसाला 7121 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. मात्र सध्या बाजारात कापसाला साडे सहा हजार रुपये प्रति क्विंटल ते 7 हजार 600 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळतं आहे.
कोणत्या बाजारात काय दर मिळतोय?
१९ सप्टेंबरला धामणगाव रेल्वे बाजारात १५० क्विंटल आवक झाली होती या मालाला बाजारात 700 असा दर मिळाला. तसेच 21 सप्टेंबरला यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 58 क्विंटल मध्यम धाग्याच्या कापसाची आवक झाली आणि येथे कापसाला 6 हजार 450 रुपये असा दर मिळाला. बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार कापसाचे दर 7500 प्रतिक्विंटल च्या आसपास स्थिर राहण्याची अपेक्षा आहे.
कापसाला कमी दर मिळण्याचे कारण नेमके काय
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे सप्टेंबर महिना उजाडला की कापसाची वेचणी सुरू होते. सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस देखील सुरू असतो. या परतीच्या पावसामुळे दरवर्षी कापूस पिकाचा दर्जा घसरतो.
तसेच पहिल्या वेचणीमध्ये मिळालेल्या कापसात नेहमीच ओलावा असतो. हा कापूस काळा किंवा पिवळा पडण्याची समस्या देखील असते. कापसाच्या बियांमधून अंकुरही फुटण्याची शक्यता असते. यामुळे हा कापूस वेचणी झाल्याबरोबर विक्रीसाठी शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळते.
अशा या परिस्थितीत सुरुवातीच्या टप्प्यात नेहमीच कापसाला कमी दर मिळत असल्याचे आत्तापर्यंतचा अनुभव सांगत आला आहे. यंदाही अशीच परिस्थिती असून सुरुवातीच्या कापसाला सध्या बाजारात फारसा भाव नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.