Cotton Rate : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी हाती येत आहे. ती म्हणजे हंगामाच्या अंतिम टप्प्यात आता पांढरे सोने वधारले आहे. पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाचे भाव हंगाम सुरू झाल्यापासूनच दबावत होते. कापसाचा हंगाम विजयादशमीला सुरू होतो. यावर्षी देखील नवीन कापूस विजयादशमीला बाजारात आला.
दरम्यान यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाला अपेक्षित असा भाव मिळाला नाही. अनेक ठिकाणी कापसाचे भाव हमीभावापेक्षा कमी होते. कापूस हे राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागातील महत्त्वाचे पीक आहे.
याशिवाय राज्यातील खानदेश विभागातील जळगाव व इतर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात कापसाची मोठ्या प्रमाणात शेती होत असते. जळगावला कापसाचे आगार म्हणून ओळखतात.
मात्र यंदा कापसाला अपेक्षित असा भाव मिळाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता कापसाचा हंगाम जवळपास अंतिम टप्प्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस विक्री करून टाकला आहे.
यामुळे बाजारपेठांमध्ये कापसाची आवक कमी होत आहे. आवक कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती सध्या बाजारपेठांमध्ये असून याच कारणाने आता बाजारभावात सुधारणा पाहायला मिळाली आहे.
मात्र बाजारभावात सुधारणा झाली असली तरी देखील आता शेतकऱ्यांकडे फारसा माल शिल्लक नसल्याने याचा शेतकऱ्यांना फायदा होणार नसल्याचा युक्तिवाद होत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या पश्चिम विदर्भातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी ७ हजार ४५० ते ७ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत आहे.
यंदा केंद्र सरकारने कापसाला ७०२० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. अर्थातच सध्याचे भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत. यामुळे कापूस उत्पादकांना निश्चितच दिलासा मिळाला आहे.
मात्र आता हंगाम अंतिम टप्प्यात आला असल्याने आणि अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस विकला असल्याने याचा फायदा नेमका कोणाला होणार हा मोठा सवाल आहे.
पण, कापसाचे दर वधारले असल्याने अन कापसाला हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याचे काहीसे समाधान शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे.