Cotton Rate : गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या बाजारभावावर मोठा दबाव पाहायला मिळत होता. कपाशी हे महाराष्ट्रात उत्पादित होणार एक महत्त्वाचे पीक आहे. अशा परिस्थितीत, बाजारात आलेल्या या मंदीचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत होता.
आता मात्र दोन महिन्यांनंतर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने गुड न्यूज मिळाली आहे. कापूस बाजारावरील दबाव आता कमी झाला असून बाजार भावात मोठी वाढ झाली आहे.
विशेष बाब अशी की आगामी काळात बाजार भाव तेजीतच राहण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे महिन्यात कापसाला काय भाव मिळणार याबाबत देखील तज्ञांनी मोठी माहिती दिली आहे.
मार्च महिन्याबद्दल बोलायचे झाले तर, या महिन्यात बाजारात कापसाचा भाव 7,000 रुपयांच्या वर आहे, जो गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त आहे.
राज्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन दिवसांपूर्वी कापसाला कमाल आठ हजार 250 रुपयाचा भाव मिळाला होता. तसेच किमान सात हजार पाचशे आणि सरासरी 8200 असा दर मिळाला होता.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, गेल्या दोन महिन्यांपूर्वी डिसेंबर 2023 मध्ये कापसाचा भाव 6,000 ते 7000 रुपयांच्या दरम्यान राहिला होता. दरम्यान, बाजारातील जाणकारांच्या मते, येत्या काही महिन्यांत कापसाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
बाजार अभ्यासकांनी म्हटल्याप्रमाणे, मार्च, एप्रिल आणि मे 2024 मध्ये भारतात कापसाचे भाव 7500-8000-8300 रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे.
अर्थातच मे महिन्यात कापसाला सर्वाधिक 8300 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी भाव मिळू शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
कापूस सरकी आणि पेंड (DHEP) चे वाढलेले दर, इतर देशांमध्ये वाढती मागणी, फॅब्रिक तथा स्पिंडल्सची वाढती मागणी आणि देशांतर्गत कापसाचे मोठ्या प्रमाणात कमी झालेले उत्पादन या सर्व पार्श्वभूमीवर आगामी काळात कापसाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
तथापि, अनेक संभाव्य धोके आहेत जे कापसाच्या किमतींवर परिणाम करू शकतात, जसे की निवडणुका किंवा अनपेक्षित बाजारातील घटना इ. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस खरेदी-विक्री करण्यापूर्वी या बाबींचा विचार करूनच पिकविक्रीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन कापूस बाजार अभ्यासकांनी केले आहे.