Cotton Rate : महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या तीन विभागात कापसाची सर्वाधिक लागवड केली जाते. या तिन्ही विभागातील बहुतांशी शेतकऱ्यांचे कापूस या नगदी पिकावर अवलंबित्व असते. येथील बहुतांशी शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस पिकावरच अर्थकारण अवलंबून असते.
याही वर्षी या तीनही विभागात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही या विभागातील बहुतांशी शेतकऱ्यांनी कापसाची पूर्व हंगामी लागवड केली होती. खानदेशात कापसाची पूर्व हंगाम लागवड नेहमीच अधिक राहते. यंदा देखील या भागात कापसाची पूर्व हंगाम लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती.
दरम्यान राज्यातील कापूस उत्पादकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कापसाचा नवीन हंगाम सुरू झाला आहे. पूर्व हंगामी लागवड केलेल्या कापसाची आता बाजारात आवक होऊ लागली आहे. कापूस पंढरी म्हणून ओळख प्राप्त असलेल्या खानदेश मध्ये पूर्व हंगामी लागवड केलेल्या कापसाची खरेदी सुरू झाली आहे.
खानदेशमधील धुळे जिल्ह्यातील कापडाने येथे खेडा पद्धतीने कापसाची खरेदी सुरू झाली आहे. खानदेश मधील बहुतांशी भागात बागायती कापसाची वेचणी सुरू झाली आहे. पूर्वहंगामी अर्ली व्हरायटीचा कापूस आता शेतकऱ्यांनी विकण्यास सुरुवात देखील केली आहे. दरम्यान खेडा खरेदीमध्ये यंदाच्या नवीन हंगामातील पूर्वहंगामी कापसाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
कापडाने येथे खेडा खरेदीत व्यापारी अरुण पाटील यांनी काटापूजन मुहूर्तावर प्रतिक्विंटल सात हजार शंभर रुपये याप्रमाणे कापसाची खरेदी केली आहे. एकूणच काय की खेडा खरेदीत मुहूर्ताच्या कापसाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. दरम्यान यावर्षी कापसाचे उत्पादन कमी राहणार असा अंदाज असल्याने कापसाला कधी नव्हे तो विक्रमी भाव मिळू शकतो असे मत प्रयोगशील शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.
यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता कापसाचे बाजार भाव 10,000 रुपये प्रति क्विंटल पार जातील असे शेतकऱ्यांना वाटतं आहे. राज्यातील बहुतांशी भागात विजयादशमीच्या अर्थातच दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस खरेदी सुरू होणार आहे. यामुळे आता त्यावेळी कापसाला काय भाव मिळणार याकडे संपूर्ण राज्यातील कापूस उत्पादकांचे लक्ष लागून राहणार आहे.