Cotton Rate : कापूस हे मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश विभागात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यभर शेती केली जाते. खानदेशात गेल्या काही वर्षांपूर्वी कापसाचे क्षेत्र कमी झाले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपूर्वी कापसाला चांगला भाव मिळाला आणि यामुळे पुन्हा एकदा खानदेशमध्ये कापसाची लागवड वाढली.
गेल्या हंगामात पुन्हा एकदा कापसाचे भाव पडलेत. हे पीक आता शेतकऱ्यांना डोईजड होऊ लागले आहे. या पिकासाठी येणारा उत्पादन खर्च हा दिवसेंदिवस वाढत असून मजुरी देखील खूपच वाढली आहे. मजूरटंचाईमुळे कापसाचे पीक हे शेतकऱ्यांसाठी तोट्याचे सिद्ध होत आहे. मात्र दुसऱ्या पिकाच्या बाबतीतही तशीच परिस्थिती असल्याने या विभागातील शेतकऱ्यांचा सर्व मदार कापूस पिकावरच आला आहे.
पण यावर्षी पावसाचे उशिराने झालेले आगमन आणि आता गेल्या काही दिवसांपासून पडलेला पावसाचा मोठा खंड यामुळे कापूस उत्पादनात थोडीशी घट येण्याची शक्यता आहे. अशातच मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गेल्या हंगामात जरी कापसाने हिरमोड केला असला तरी देखील या येत्या हंगामात कापूस शेतकऱ्यांना मालामाल बनवणार आहे.
यंदा कापसाला विक्रमी भाव मिळणार असा अंदाज आहे. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या कृषी विभागाने येत्या हंगामात जागतिक कापूस उत्पादन सहा टक्क्यांनी घटनार असा अंदाज व्यक्त केला आहे. चीन, भारत, अमेरिका आणि ब्राझील या प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये कापसाचे उत्पादन घटणार असा अंदाज आहे.
आपल्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, या चार देशांमध्ये एकूण कापसाच्या उत्पादनाचे 70 टक्के उत्पादन घेतले जाते. यामुळे या देशाच्या कापूस उत्पादनावरच कापसाचे एकूण उत्पादन अवलंबून असते. आता याच प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये कापसाचे उत्पादन घटणार असे सांगितले जात आहे. शिवाय चीनमध्ये आणि भारतात कापसाची मागणी वधारण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या कृषी विभागाने सांगितल्याप्रमाणे यंदा चीनचे कापूस उत्पादन 12 टक्क्यांनी कमी होणार आहे तर भारताच कापूस उत्पादन दोन टक्क्यांनी कमी होणार आहे. विशेष म्हणजे चीनचा कापसाचा वापर वाढणार आहे आणि आपला देखील कापसाचा वापर चार टक्क्यांनी वाढणार आहे. या सर्व प्रश्वभूमीवर कापसाची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती जागतिक पातळीवर तयार होईल आणि ही परिस्थिती आगामी हंगामात कापूस दरवाढीसाठी पोषक ठरू शकते असा दावा केला जात आहे.
मात्र आत्तापासूनच उत्पादनाच्या बाबतीत ठोस काही सांगता येणे शक्य नाही. पण पावसाचा हा लहरीपणा पाहता यंदा सर्वकाही आलबेल राहणार नाही. यामुळे उत्पादनात कुठे ना कुठे कमतरता येऊ शकते. म्हणून आता किती उत्पादन कमी होते आणि आपल्याच देशात उत्पादन कमी होते की प्रमुख कापूस उत्पादक असलेल्या सर्वच देशात कापसाचे उत्पादन कमी होते? यावरच कापूस बाजाराचा पुढील घटनाक्रम अवलंबून राहणार आहे. मात्र आतापर्यंतची परिस्थिती पाहता यंदा कापसाला चांगला भाव मिळू शकतो असा दावा केला जात आहे.