Cotton Rate : कापसाला नगदी पिकाचा दर्जा प्राप्त आहे. याच्या विक्रीतून शेतकऱ्यांना ताबडतोब पैसा उपलब्ध होत असल्याने याला कॅश क्रॉप म्हणून ओळखतात. मात्र गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कापसाचे भाव दबावात आहेत. दोन वर्षांपूर्वी पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस बाजारपेठांमध्ये दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल या विक्रमी दरात विकले गेले.
त्यावेळी शेतकऱ्यांना कापसाच्या पिकातून चांगली कमाई झाली यात शंकाच नाही. मात्र गेल्या दीड-दोन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी हे पीक डोईजड ठरत आहे.
या चालू हंगामाबाबत बोलायचं झालं तर सुरुवातीला म्हणजेच विजयादशमीच्या पिरियडमध्ये कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत होता.
मात्र, सुरुवातीचा टप्पा सोडला असता बरेच दिवस कापसाचे भाव दबावात पाहायला मिळालेत. अनेक ठिकाणी हमीभावापेक्षा कमी दरात कापूस विकावा लागला. यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नव्हता.
आता मात्र गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा परिस्थिती बदलू पाहत आहे. हंगामाच्या शेवटी का होईना पण कापसाच्या बाजारभावात सुधारणा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
काल-परवा राज्यातील देऊळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला विक्रमी आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. विशेष म्हणजे देऊळगाव एपीएमसीमध्ये मिळालेला हा भाव हंगामातील सर्वाधिक दर असल्याचा दावा करण्यात आला आहे.
आज देखील कापसाचे कमाल बाजारभाव राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 8000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक नमूद करण्यात आले आहेत. बाजार अभ्यासकांनी म्हटल्याप्रमाणे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार असा अंदाज विश्वसनीय संस्थेच्या माध्यमातून समोर येताच बाजारभावाने कलाटणी घेतली आहे.
बाजार भाव आता उत्पादन कमी राहणार म्हणून वाढू लागले आहेत. शिवाय जागतिक बाजारांमध्ये भारताच्या कापसाची मागणी वाढत आहे. जागतिक बाजारपेठेशी तुलना केली असता भारतीय कापूस स्वस्त आहे. यामुळे भारतीय कापसाला मागणी आहे.
रुई आणि सरकीच्या बाजारभावात देखील वाढ झाली आहे. देशांतर्गत उद्योगांमध्ये कापसाचे मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता बाजारभाव हळूहळू सुधारत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आज अकोला जिल्ह्यातील बोरगावमंजू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला कमाल आठ हजार रुपये, किमान 7300 आणि सरासरी 7650 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. अकोट बाजार समितीत आज किमान 7500 रुपये प्रतिक्विंटल, कमाल भाव 8280 रुपये प्रतिक्विंटल आणि सरासरी 8200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.